चंद्रपूर : चंद्रपूरच्या माऊंट कार्मेल शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय... फळ्यावर लिहिलेला अभ्यास लिहिला नाही, म्हणून या शिक्षिकेनं केजीच्या वर्गातल्या दोघा विद्यार्थिनींना बेदम मारहाण केली. अगदी त्यांचे केस उपटून त्यांना मारझोड केली. मलिका सरकार असं या शिक्षिकेचं नाव आहे.
ज्या मुलीचे केस उपटून मारहाण करण्यात आली, तिच्या आईवडिलांनी या प्रकाराबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली. सुरूवातीला मारहाणीच्या प्रकाराचा शिक्षिकेनं तसंच मुख्याध्यापिकेनं इन्कार केला. मात्र पालकांनी वर्गातलं सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याचा आग्रह धरला. त्यानंतर सीसीटीव्हीत जे दिसलं ते कुठल्याही संवेदनशील पालकाची झोप उडवणारं होतं.
पहिल्या बेंचवरील मुलींना बेदम मारहाण, उपटलेले केस, भेदरलेला वर्ग, अत्याचारी शिक्षिका आणि शिक्षा म्हणून मुलींना वर्गात मागच्या बाकावर बसवलं जाणं, असा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झालाय.
लाखो रूपये फी उकळणा-या कॉन्व्हेंट शाळेत विद्यार्थ्यांना कशी अमानुष वागणूक मिळते, हे यामुळं समोर आलंय. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर, शाळेनं शिक्षिकेला कामावरून काढून टाकलंय.
मन सुन्न करणारी अशीच ही बातमी... ऐकून केवळ मनात संताप निर्माण करणारी... मात्र केवळ एका शिक्षिकेवर कारवाई करून भागणार नाहीय... तर चिमुकल्या जीवांना मारहाण करण्याच्या शिक्षकी प्रवृत्तीला आळा कसा घालणार, हा खरा प्रश्न आहे.