अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : केवळ चहाच्या विक्रीतून महिन्याला लाखो रुपयांचा व्यवसाय करणारे पुण्यातलं येवले अमृततुल्य सध्या चांगलचं चर्चेत आहे. चहाची चव आणि त्याचा असामान्य दर्जा कायम राखल्यानं येवले अमृततुल्यनं, ही किमया साधली आहे. त्यावरचाच हा आमचा विशेष वृत्तांत.
अमृताशी ज्याची तुलना होईल असा हा वाफाळणारा चहा. कल्हई केलेल्या पितळाच्या भांड्यात उकळणारा चहा.. एक घोट घेतल्यानंतर तजेलदार करणारा हा चहा... मनाला तृप्त करणारी ही वैशिष्ट्यं आहेत पुण्यातल्या येवले टी हाऊसची.
एकदा चहा पिऊन तर पहा असं ब्रीद असलेल्या पुण्याच्या येवले अमृततुल्यची बातच न्याहरी. ग्राहकांची चहाची तलफ भागवणाऱ्या, या येवले अमृततुल्यची आणखी एक खास बात आहे. ते म्हणजे येवले अमृततुल्यला मिळणारं मासिक उत्पन्न.
सामान्यपणे एखाद्या चहा विक्रेत्याचं उत्पन्न महिन्याला 15 ते 20 हजार असू शकतं. मात्र येवले अमृततुल्यचे मालक चहा विक्रीतून महिन्याकाठी तब्बल 12 लाख रुपये उत्पन्न मिळवतात. ही कमाई ऐकून कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही. मात्र चहाचा गोडवा आणि ग्राहकांचं समाधान याच्या जोरावर येवले अमृततुल्यनं कमाईचा नवा विक्रम रचलाय.
येवले टी हाऊसचे सध्या पुण्यात तीन स्टॉल असून, प्रत्येक टी हाऊसमध्ये 12 जण काम करतात. त्यांच्या चहाच्या चवीमुळे येवले टी हाऊस हे सर्वच चहाप्रेमींचे आवडीचे ठिकाण बनलंय.
गुणवत्तेच्या जोरावर मासिक 12 लाख रुपये कमाई, करण्याचा येवले कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहेच. सोबतच हाच दर्जा कायम राखण्याच्या जबाबदारीचीही त्यांना जाणीव आहे. आता येवले अमृततुल्यचा ब्रँड जगभरात पोहचवण्याची त्यांची इच्छा आहे.
चहा विक्रीचा व्यवसाय भारतीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार देतोय. छोट्याशा व्यवसायातूनही चांगली कमाई करता येते हेच येवले कुटुंबीयांनी सिद्ध करुन दाखवलंय. त्यामुळे लाखोंची कमाईचं साधन बनलेला हा चहा एकदा तरी नक्की प्यायलाच हवा.