रायगड : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौत्के चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम आता विविध ठिकाणी दिसू लागला आहे. तौक्ते चक्रीवादळ हे गुजरातच्या दिशेने जात आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर देखील याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. त्यामुळे कोकणात सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव हा मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये देखील पाहायला मिळू शकतो. रायगडमध्ये यामुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण तालुक्यातील 1600 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या नागरिकांना शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
जिल्ह्यात पहाटे 5 वाजता जोरदार पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे.