भुशी डॅमनंतर ताम्हिणी घाटातही तशीच घटना, अती उत्साहाच्या भरात तरुणाने जीव गमावला

Tamhini Ghat Accident : पावसाळा सुरु झाला की पर्यटनात वाढ होते. त्यातही विकेंड किंवा लागोपाठ सुट्ट्या आल्यावर गड आणि किल्ल्यांवर तसंच पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढल्याचं चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसतंय. मात्र ही गर्दी त्रास देणारी ठरतेय. काही अतिउत्साही लोकांमुळे पर्यटनालाच गालबोट लागलंय

राजीव कासले | Updated: Jul 2, 2024, 10:41 PM IST
भुशी डॅमनंतर ताम्हिणी घाटातही तशीच घटना, अती उत्साहाच्या भरात तरुणाने जीव गमावला title=

Tamhini Ghat Accident : लोणावळ्याच्या भूशी डॅममध्ये (Bushi Dam) एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटातही  (Tamhini Gaht) तशीच घटना समोर आली आहे. इथल्या प्लस व्हॅलीमध्ये एका तरुणाने जीव गमावला. स्वप्नील धावडे हा तरुण जिममधल्या 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. तिथल्या पाण्यात त्याने उडी मारली. मात्र त्यानंतर त्याला काठावर येणं अशक्य झालं. पाण्याच्या जोरदार प्रवाहात  तो बेपत्ता झाला. प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध बचावपथकाने घेतला. मात्र आज स्वप्नीलचा मृतदेह रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये आढळून आला. 

कोल्हापूरात दोघं धरणात बुडाले
कोल्हापुरातही पावसाळी पर्यटनासाठी आलेले दोघे काळम्मावाडी धरणात बुडालेत. गणेश कदम आणि प्रतीक पाटील असं वाहून गेलेल्या दोघांची नावं आहेत. पावसाळा सुरु झाला की पर्यटकांचा (Tourist) उत्साह वाढतो.. मात्र हाच उत्साह अति होतो आणि दुर्घटना घडतात. शनिवारी-रविवारी कुठेही गेलात तरी प्रचंड गर्दी पर्यटन स्थळांवर दिसून येते.  

माळशेज घाट असो किंवा मग कसारा घाट. इथला निसर्ग पावसाळ्यात पर्यटकांना खुणावतो. मात्र पर्यटनाऐवजी काही पर्यटक इथे उच्छाद मांडताना दिसतात. रस्त्यांवर गाड्या पार्क करुन वाहतूक कोंडी तर करतातच. मात्र अपघातांनाही निमंत्रण देतात.. पर्यटन स्थळांचीच नाही तर अगदी गड किल्ल्यांनाही या उच्छाद मांडणाऱ्या पर्यटकांनी सोडलेलं नाही.

किल्ल्यांवरच्या गर्दीचा हरिहर किल्ला, अशेरी किल्ला, लोहगड किंवा विसापूर किल्ला, महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई, सह्याद्रीच्या शिखररांगेतल्या सर्वच किल्ल्यांना आता अतिउत्साही पर्यटकांचा विळखा पडलाय. सोशल मीडियात सध्या सर्वात प्रसिद्ध असणारा असा हा हरिहर गड. या गडाचे रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. लाखोंचे व्ह्यूज त्या व्हिडिओजना मिळतात आणि म्हणूनच याच हरिहर गडावर रिल्स करण्यासाठी अतिउत्साही पर्यटकांची झुंबड उडते. कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर.. चढायला कठीण. मात्र अतिउत्साही पर्यटकांनी इथेही सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केलाय.

पर्यटक काळजी घेत नसल्याने दुर्घटनाही घडताना दिसतायत. तसंच उच्छाद मांडणाऱ्यांमुळे पर्यटनाला गालबोट लागत असल्याचंही दिसतंय. त्यामुळे या उच्छाद मांडणाऱ्यांना तसंच हुल्लडबाजांना आवरा अशी मागणी पर्यटक तसंच ट्रेकर्सही करताना दिसतायत.