संजय पवार, झी मीडिया, सोलापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सरकारी कर्मचाऱ्याला चिखलाने आंघोळ घातल्यानंतर आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. निेतेश राणेंना ९ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. आता नितेश राणेंच्या या कृत्याबद्दल अभियंताही आक्रमक झाले आहेत. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रकाश शेडेकर यांना चिखलाची अंघोळ घालून बांधून ठेवल्याप्रकरणीचा सर्व अभियंतांकडून संताप होत आहे. नितेश राणेंनी केलेल्या चिखलफेकीचा निषेध म्हणून सोलापुरात सार्वजनिक बांधकाम विभाग, जसधारण विभाग, कृष्ण खोरे महामंडळचे अभियंते आणि कर्मचारी आज एकत्र जमून घडवून आणलेल्या घटनेचा निषेध नोंदवलाय. मंत्री महोदयांच्या कारवाईच्या आश्वासनाने दोन दिवसांचे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. केवळ आज निषेध आंदोलन केलाय, पुढचा टप्पा सोमवारी लेखणी बंद आंदोलन आहे. जर नितेश राणे यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलनाचे हत्यार उचलणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
कणकवली पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी नितेश राणे यांना ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने नितीश यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नितेश यांच्यासह त्यांच्या १८ समर्थकांची रवानगीही पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
या सुनावणीवेळी न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने राणे यांचे समर्थक जमले होते. या प्रकरणात नितेश यांना जामीन मिळेल, असे त्यांना वाटत होते. मात्र, न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केल्याने समर्थकांना मोठा धक्का बसला. नितेश यांचे बंधू निलेश यांनी न्यायालयाच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. नितेश राणे यांनी जनतेचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता त्यांना या प्रकरणात गोवले जात असल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी व्यक्त केली.
नितेश राणे आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी मु्ंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी सरकारला जबाबदार धरत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाने आंघोळ घातली होती. नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बादलीतून आणलेला चिखल ओतला. यानंतर प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पुलावर बांधूनही ठेवण्यात आले होते.
या प्रकाराबद्दल नितेश यांचे वडील नारायण राणे यांनी माफीही मागितली होती. महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करण्यात काही गैर नाही. मात्र, नितेशच्या समर्थकांनी केलेल्या हिंसक कृतीचे समर्थन करता येणार नाही. मी कदापि त्याला पाठिंबा देणार नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले होते.