प्रताप नाईक, कोल्हापूर, झी मीडिया : विधानपरिषदेच्या सदस्य निवडीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अंतर्गत वाद अखेर शुक्रवारी रात्री उशिरा मिटले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली आणि आपला वाद मिटवला. 'आपण एक' असल्याचं म्हणत यांचा फोटो व्हायरल झाला आहे.
यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी याचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे. राजू शेट्टी यांच्या विधानपरिषद उमेदवारी वरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय
राजू शेट्टी यांच्या बैठकीत घेतला आहे. नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक याची नाराजी दूर करून शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आले आहेत. या बैठकीत राजू शेटटी, प्रा. डाॅ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, डॉ. महावीर अक्कोळे, पै. विठ्ठल मोरे, भाऊ साखरपे, जनार्दन पाटील,अजित पवार, डॉ. श्रीवर्धन पाटील हे उपस्थित होते.
राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ स्वाभिमानीच्या महिला प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी रक्तानं पत्र लिहिलं आहे. “तुम्ही आमदारकी स्वीकारावी ही तमाम शेतकऱ्यांची भावना आहे. पद असो किंवा नसो तुम्ही ढासळू नका,” अशी भावनिक साद पूजा मोरे यांनी राजू शेट्टींना घातली आहे. “शेतकऱ्यांसाठी रक्त सांडण्याचा तुमचा विचार जिवंत राहिला पाहिजे,” यासाठी रक्ताने पत्र लिहिल्याचा खुलासाही पूजा मोरे यांनी केला आहे.
राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.