'संघर्षाच्या काळात आपण सर्व अडचणींवर...'; 'तो' स्क्रीनशॉट शेअर करत सुप्रिया सुळेंच्या वडिलांना शुभेच्छा

Supriya Sule Special Birthday Wishes: आपल्या 56 वर्षांच्या करकिर्दीमध्ये शरद पवारांनी 4 वेळा राज्याच्या मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. आज 84 वा वाढदिवस साजरा करणारे शरद पवार हे देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 12, 2023, 11:34 AM IST
'संघर्षाच्या काळात आपण सर्व अडचणींवर...'; 'तो' स्क्रीनशॉट शेअर करत सुप्रिया सुळेंच्या वडिलांना शुभेच्छा title=
सोशल मीडियावरुन दिल्या शुभेच्छा

Supriya Sule Special Birthday Wishes: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि राज्यातील इतर समस्यांच्या पार्श्वभूमीवर आपण वाढदिवस साजरा करणार नाही असं शरद पवारांनी आधीच जाहीर केलं आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलांबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचा स्क्रीनशॉट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लोक तुमचे सांगाती आणि...

"आधी लढाई जनहिताची! प्रिय बाबा, आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती," असं म्हणत सुप्रिया सुळेंनी आपल्या पोस्टची सुरुवात केली आहे. "मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत," असं  सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

मी सभागृहात लढते आहे

"कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे. मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे," असं सुप्रिया सुळे पोस्टमध्ये म्हणाल्या.

लढेंगे-जितेंगे

"आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव (आबा ) यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि  आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे !" असं सुप्रिया सुळेंनी नमूद केलं आहे. पोस्टच्या शेवटी सुप्रिया सुळेंनी, "बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!" असं म्हटलं आहे.

मोदींच्याही शुभेच्छा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवारांना शुभेच्छा देताना मी त्यांच्या निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो असं म्हटलं आहे.

आपल्या 56 वर्षांच्या करकिर्दीमध्ये शरद पवारांनी 4 वेळा राज्याच्या मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. आज 84 वा वाढदिवस साजरा करणारे शरद पवार हे देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे.