लग्नाच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंना पतीचा आश्चर्याचा सुखद धक्का!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे.

Updated: Mar 4, 2019, 06:25 PM IST
लग्नाच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंना पतीचा आश्चर्याचा सुखद धक्का! title=

अरुण मेहेत्रेंसह जावेद मुलानी, झी २४ तास, जेजुरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं त्यांचे पती सदानंद सुळे यांनी त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. जेजुरी गडावर खंडेरायांच्या दर्शनाला आलेल्या सुप्रियांना त्यांनी चक्क उचलून घेतलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे विरोधी पक्षात असल्या तरी घरामध्ये त्याच 'होम मिनिस्टर' असतात. आणि या होम मिनिस्टरना खूश करण्याची संधी त्यांचे पती उद्योजक सदानंद सुळे यांना  मिळाली. सुप्रिया आणि सदानंद सुळे दाम्पत्याच्या लग्नाचा सोमवार ४ मार्चला २८ वा वाढदिवस होता. त्यात महाशिवरात्रीचा योग जुळून आल्यामुळे सुळे दाम्पत्य जेजुरी गडावर खंडेरायांच्या दर्शनाला आलं. जेजुरी गड म्हणजे नऊ लाख पायरींचा डोंगर. इथं नवविवाहित जोडपी दर्शनाला आल्यानंतर पतीदेव नववधूला उचलून घेतात आणि किमान पाच पायऱ्या तरी चालतात. या प्रथेनुसार, खासदार सुप्रिया सुळेंना पतीराजांनी चक्क उचलून घेतलं. सदानंदाचा यळकोट असा गजरही उपस्थितांनी केला. पण शेवटी सुप्रिया सुळे म्हणजे साक्षात शरद पवारांची वजनदार कन्या. त्यामुळे नाव सदानंद असलं तरीही हे आव्हान पेलताना सुळेंची चांगलीच दमछाक झाली.

यानिमित्ताने सुळे दाम्पत्याच्या प्रेमळ नात्याचं दर्शन उपस्थितांना झालं. राजकारणाच्या धकाधकीत असलेल्या सुप्रिया सुळेंनी आणि उद्योग विश्व सांभाळणाऱ्या सदानंद सुळेंनी 'यळकोट यळकोट जय मल्हार' असा गजर करत भंडारा उधळला. मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेतलं आणि स्वतःसाठी नाही, तर 'राज्यात भरपूर पाऊस पडू दे, बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे' असं साकडं खंडोबाला घातलं.