मुंबई : ठाण्यातील मेट्रो-४ साठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयाने 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे नागरिक प्रतिष्ठान आणि पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. वडाळा ते ठाणे या मेट्रो-४ मार्गिकेसंदर्भात रोहित जोशी यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती.
मेट्रो ही उन्नत नसावी यासह अनेक मागण्या त्यांनी या याचिकेत केल्या होत्या. पण या याचिकेवर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने कोणतेही उत्तर दिले नाही आणि सप्टेंबरमध्ये झाडे तोडण्यास सुरूवात केली. सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश देऊन रोहित जोशी यांना याचिकेत बदल करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. या निर्णयामुळे प्राधिकरणाला चांगलीच चपराक बसली आहे.
ठाणे मेट्रो -४च्या मार्गात येणाऱ्या जवळपास ३,५०० झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार होती. किंवा ही झाडे दुसरीकडे लावण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यांच पुनर्रोपन करण्याची योजना होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशनांतर वृक्षतोडीला स्थगिती मिळाली आहे.
दरम्यान, आरेतील मेट्रो कारशेडसाठी मोठ्याप्रमाणात वृक्षतोड झाल्याने जोरदार विरोध झाला. त्यानंतर वृक्षप्रेमींना आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्यांवर देवेंद्र फडणवीस सरकारने गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे आताच्या महाराष्ट्र विकासआघाडी सकारने ते गुन्हे मागे घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे मागे घेण्यासाठी आदेश दिले. त्याचवेळी मेट्रोकारशेडचे कामही थांबविण्याचे आदेश दिले आहे. आरेमधील एकही वृक्षाचे पान तोडू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाचे वृक्षप्रेमींकडून स्वागत होत आहे. आता ठाणे मेट्रो -४ साठी करण्यात येणारी वृक्षतोड सर्वोच्च न्यायालयाने थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
तर दुसरीकडे ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महानगर पालिकेने जलद वाहतूक प्रणाली म्हणून ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रणालीची शिफारस राज्य सरकारला केली होती. राज्य मंत्रिमंडळाने या वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. ठाणे शहर आणि परिसरातील वाहतुकीची वाढती गरज भागविण्यासाठी कॉम्प्रिहेन्सीव्ह मोबिलिटी प्लान तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये जलद वाहतूक प्रणाली म्हणून ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रणालीची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने या मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्पदेखील मंजूर केला. या अहवालास शासनानेही मान्यता दिली आहे.
ठाणे शहर अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प हा नवीन ठाणे ते ठाणे या दरम्यान २९ किमी अंतराचा असेल. यामध्ये २० उन्नत तर दोन भुयारी अशी एकूण २२ स्थानके असतील. सुमारे १३ हजार ९५ कोटींच्या या प्रकल्पामुळे २०२५ मध्ये दररोज ५ लाख ७६ हजार तर २०४५ मध्ये दररोज ८ लाख ७२ हजार प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे.