सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, पण प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहा कधी होणार?

Election News : ओबीसी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला. मात्र प्रत्यक्षात निवडणुका या पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. 

Updated: May 5, 2022, 08:03 AM IST
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, पण प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहा कधी होणार? title=

मुंबई : Election News : ओबीसी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला. मात्र प्रत्यक्षात निवडणुका या पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. कारण सप्टेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे अधिकार आपल्याकडे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. तसेच 15 दिवसांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिलेत. मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायला तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक सप्टेंबरमध्ये होईल असे चित्र दिसत आहे. 

प्रभाग रचनेसह सर्व तयारीसाठी राज्य निवडणूक आयोगाला तीन महिने लागू शकतात. राज्यात लवकरच पाऊसकाळ सुरु होतोय, या कालावधीत निवडणुकांचा कार्यक्रम शक्यतो पार पाडला जात नाही. सर्वोच्च न्यायालयानं दोन आठवडयांत निकालाचा कार्यक्रम जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.  पाऊस, प्रशासकीय तयारीचे कारण देत निवडणूक आयोग हा कार्यक्रम जाहीर करु शकतं का, याची उत्सुकता असेल. 

एका आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असा काल सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिला असल्याने महाविकास आघाडीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आज 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. राजकीय ओबीसी आरक्षण, कायदा सुव्यवस्था यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. 

येत्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्याने राज्य सरकारला मोठा दणका समजला जात आहे. मुंबईसह अनेक पालिकांची मुदत उलटून गेली आहे. आता या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. यावरुन विरोधकांनी टिकेची झोड उठवलीये, तर आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.