दौंड, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार सुनील तटकरेंचा आहे, असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यासपीठावरून जाहीर करून टाकलं. पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये झालेल्या हल्लाबोल यात्रेवेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितल्यानंतर काँग्रेसनं बारामती सोडण्याची मागणी केलीय. यावर भाष्य करताना बारामतीमधून सुप्रिया सुळेच उमेदवार असतील, असं भाकित अजित पवारांनी केलं. मात्र, हा अधिकार तटकरेंचा असल्याचं पवार म्हणाले.
अजित पवारांच्या या वाक्यावर तटकरे उठून उभे राहिले आणि त्यांनी चक्क जमिनीला हात लावून नमस्कार केला... त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच खसखस पिकली...
दरम्यान, अजित पवारांनी या सभेत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनाही सज्जड दम भरलाय... आपला नाद करू नका, अशा शब्दांत पवारांनी बापटांवर तोफ डागलीय.
दरम्यान, २०१९ मध्ये पुण्याचा खासदार हा राष्ट्रवादीचा असेल असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील लोकसभेच्या जागेवर दावा सांगितलाय. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातील संभाव्य राजकीय समीकरणं काय असतील? यावर आतापासूनच चर्चा सुरु झालीय. या पार्श्वभूमीवर थेट बारामतीच्या जागेची मागणी करून काँग्रेसनं राष्ट्रवादीला काटशह देण्याचा प्रयत्न केलाय.