साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे 1 कोटी 80 लाख रुपये बुडविलेत

अशोक चव्हाणांचं वर्चस्व असलेल्या साखर कारखान्यानं, शेतकऱ्यांचे 1 कोटी 80 लाख रुपये बुडवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर साखर आयुक्तांनी आदेश देऊन याबाबत तपासणी केली.  

Updated: Nov 16, 2017, 11:45 PM IST
साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे 1 कोटी 80 लाख रुपये बुडविलेत  title=

नांदेड : अशोक चव्हाणांचं वर्चस्व असलेल्या साखर कारखान्यानं, शेतकऱ्यांचे 1 कोटी 80 लाख रुपये बुडवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर साखर आयुक्तांनी आदेश देऊन याबाबत तपासणी केली.  

मराठवाड्यातला सर्वात चांगला कारखाना म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचं वर्चस्व असलेल्या भाऊराव चव्हाण कारखान्याची ओळख आहे. 2013-14 च्या गाळप हंगामात भाऊराव चव्हाण कारखान्याकडे एफ आर पी च्या रकमेप्रमाणे 5 कोटी 11 लाख रुपये थकीत होते. मार्च 2016 पर्यंत थकबाकीत ही रक्कम दिसत होती. पण मे 2016 मध्ये ही रक्कम कागदावरुन गायब झाली. 

शेतकऱ्यांना पैसेच न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महिती अधिकारात ही बाब उघड केली. भाऊराव चव्हाण कारखान्याच्या युनिट 1 कडे 1 कोटी 21 लाख आणि युनिट दोनकडे 60 लाख रुपये थकबाकी असल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. 

अहमदनगर प्रादेशिक सहसंचालकांनी 25 ऑक्टोबरला साखर आयुक्तांना अहवाल दिला. या अहवालावरुन साखर आयुक्तांनी नांदेड प्रादेशिक सहसंचालकांना पुढल्या कारवाईचे आदेशही दिले. मात्र प्रादेशिक सहसंचालक कार्यालयानं कारवाईला टाळाटाळ केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप आहे. 

याबाबत भाऊराव चव्हाण कारखाना व्यवस्थापनाशी आम्ही संपर्क साधला असता, साखर आयुक्त कार्यालयाचे कुठलेही आदेश अजूनपर्यंत आले नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र कॅमेरासमोर बोलायला त्यांनी नकार दिला.

दरम्यान भाऊराव चव्हाण साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचे  थकवलेले पैसे ही तांत्रिक चूक असून, लवकरच शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळतील असं साखर आयुक्तांनी सांगितलंय. एकंदरीत शेतकऱ्यांना त्यांचे मेहेनतीचे पैसे मिळणं महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.