मुंबई : महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या तळीरामांना सहा महिने तुरुंगवास किंवा १० हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या गड किल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी गृहविभागाने हा निर्णय घेतलाय.
राज्यात सुमारे साडे तीनशे गडकिल्ले आहेत. मात्र काही जण याला पिकनीक स्पॉट समजून दारू पार्ट्या करतात. यापूर्वी अशा तळीरामांना शिवप्रेमींनी चोप दिल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा तळीरामांना आवर घालण्यासाठी आणि गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी गृहविभागानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
या निर्णया अंतगर्त गडकिल्ल्यांवर दारु पिऊन गैरवर्तन करणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दहा हजारांपर्यंत दंड होणार आहे. गडकिल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांकडून राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. या संस्थांकडून स्वत:चा वेळ खर्च करत गडकिल्ल्यांवर स्वच्छता, संवर्धनाचे कार्य होत असते. गड किल्ल्यांवर दारु पिणाऱ्यांना समज दिली जाते. पण कायदे कठोर नसल्याने या सेवाभावी संस्था देखील हतबल होतात.