सावंतवाडी : शिवसेना नेते खासदार विनायक राउत याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगाव मालवण येथील बंगल्यावर अज्ञात व्यक्तीनी सोड्याच्या बाटल्या तसेच दगडफेक केली. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली असून चार ते पाच व्यक्ती दुचाकीने आल्या होत्या, असे राऊत यांच्या निकटवर्तीयानी सांगितले. सर्व जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून याबाबत पोलीसांना माहिती दिल्याचे सांगितले.
राऊत यांचे निकटवर्तीय नागेंद्र परब यांनी या घटनेला दुजोरा देत पोलीसांकडून या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले तसेच हे चार ते पाच दुचाकी स्वार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले या घटनेची माहिती दिल्ली येथे खासदार विनायक राऊत यांना देण्यात आली आहे, असे परब म्हणाले. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या अटके चे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटत असल्याचे दिसून येत असून पोलीसांकडून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांविरोधातलं वक्तव्य अखेर भोवलं असून नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. यानंतर शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये ठिकठिकाणी राडा दिसून आला याचेच पडसाद कोकणात विशेषत: सिंधुदुर्गात दिसून आले. दिवसभराच्या हाय व्होलटेज ड्रामानंतर नारायण राणे यांना सुनावणीनंतर न्यायालयीन कोठ़डी सुनावण्यात आली, ज्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.