लोकोपयोगी कामं अडू नयेत यासाठी एकनाथ शिंदेंचं 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल'

राज्यात कोरोनाचा फैलाव पाहता ....

Updated: Oct 1, 2020, 03:10 PM IST
लोकोपयोगी कामं अडू नयेत यासाठी एकनाथ शिंदेंचं 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल'  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : देशात coronavirus कोरोना व्हायरसचा संसर्ग अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच महाराष्ट्रातही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव पाहता सध्याच्या घडीला लॉकडाऊनही ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलं. आहे. असं असलं तरीही बऱ्याच नियमांमध्ये मात्र शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मंत्रीमहोदय, नेतेमंडळी आणि प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही कसोशीनं प्रयत्न करत आहेत. असं असतानाच त्यांनाची या विषाणीच्या संसर्गानं विळख्यात घेतलं आहे. 

महाविकासआघाडी सरकारमधील काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये नुकतीच नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. ज्यानंतर त्यांच्यावर उपचारही सुरु करण्यात आले. पण, एक मंत्री आणि जनमानसातील नेता म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे याची जाण ठेवत या कोरोनामुळं महत्त्वाची कामं थांबू नयेत यासाठी त्यांनी तेट रुग्णालयातूनही काम करण्याचा निर्णय घेतला. 

ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी काही कालावधीसाठीच्या आपल्या या कार्यालयातून काम करत असल्याची माहिती दिली. 

'कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असून कोणत्याही प्रकारची लोकोपयोगी कामे माझ्यामुळे अडून राहू नये म्हणून रुग्णालयातूनच कामाला सुरुवात करत आहे. आपल्या सर्वांच्या प्रार्थना, आशीर्वाद व शुभेच्छांमुळे माझी तब्येत सुधारत असून लवकरात लवकर प्रत्यक्ष जनसेवेकरीता हजर होईन', असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं. 

नागरिकांच्या कोणत्याही कामाचा आपल्यामुळं खोळंबा होऊन त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठीच एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. एकिकडे कोरोनावर मात करण्यासाठीचा त्यांचा लढा सुरु असतानाच ते आपली जबाबदारीही तितक्याच शिताफीनं पार पाडत आहेत. अशा या नेत्याची सोशल मीडियावर, समर्थकांकडून आणि राजकीय वर्तुळातही बरीच प्रशंसा केली जात आहे. शिवाय त्यांनी लवकरात लवकर कोरोनावर मात करावी अशी आशाही व्यक्त केली जात आहे.