आयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्राला- देशमुख

कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्राला

Updated: Apr 10, 2020, 04:06 PM IST

मुंबई : कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्राला असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. वाधवानप्रकरणी गृहमंत्री जबाबदार असून देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. याला गृहमंत्री देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेत्यांना आवाहन आहे की त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून कारवाई करावी असे देशमुख म्हणाले. 

अमिताभ गुप्ता यांची अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक चौकशी करणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आता सरकार त्यांची चौकशी करणार असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले.

कोरोनाचा संकट वाढत असल्याने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना वाधवान कुटुंबियांनी मुंबई - खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट घेणाऱ्या दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम १८८ अन्वये देशव्यापी लॉकडाऊनमुळे जारी केलेल्या कलम १४४ अंतर्गत कोरोना व्हायरस काळात प्रवास करणे, सरकारी नियमांचे उल्लंघन करणे याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाधवान यांच्यावर आयपीसी १८८, २६९, २७०, ३४ त्याच बरोबर आपत्कालिन व्यवस्थानच्या सेक्शन ५१ बी तसेच कोविड १९ च्या सेक्शन ११ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे देशमुख म्हणाले.

तसेच लॉकडाऊन काळात महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी परवानगी देऊन लॉकडाऊन काळात वाधवान यांना मदत केल्याप्रकरणी गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

डीएचएफएल कंपनी आणि येस बँक फसवणूक प्रकरणात जामिनावर असलेल्या बंधू धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांनी कुटुंबाच्या आपत्कालीन परिस्थितीचे कारण सांगून खंडाळ्याहून महाबळेश्वरकडे जाण्यास परवानगी मिळाली होती. 

मात्र, चौकशीत काही बाब उघड झाली आहे. अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती त्यांच्यापुढे निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे संचारबंदीच्या कलम १४४चा भंग केला आहे. तसेच लॉकडाऊन काळात जारी करण्यात आलेले कलम १८८चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.