एसटी संप : राज्य सरकारच्या कारवाई इशाऱ्यानंतर अनेक कर्मचारी आंदोलनावर ठाम, 10000 कामावर परतले

ST Bus Strike News : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतरही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत.  

Updated: Nov 26, 2021, 12:36 PM IST
एसटी संप : राज्य सरकारच्या कारवाई इशाऱ्यानंतर अनेक कर्मचारी आंदोलनावर ठाम, 10000 कामावर परतले title=
संग्रहित छाया

मुंबई : ST Bus Strike News : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतरही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. सेवा समाप्ती आणि निलंबनाच्या कारवाईला घाबरणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, पगारवाढीनंतर 10 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. राज्यातील 24 आगारांमधील एसटी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना आज कामावर हजर राहण्याचे आदेश दिलेले असतानाही कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. स्वारगेट आगारातून एकही गाडी बाहेर निघालेली नाही. सेवा समाप्ती आणि निलंबित केले तरीही विलीनीकरण होईपर्यंत कोणीही कामावर जाणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, नागपूरमध्येही कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. कारवाई झाली तरी चालेल मात्र विलिनीकरनाशिवाय माघार घेणारच नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्र्यांनी अल्टिमेटम दिला आहे. आज कामावर रूजू होण्यासाठी शेवटचा दिवस आहे. जर आज कामावर कर्मचारी रुजू झाले नाहीत तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तरीदेखील कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. तर पुण्यातही एसटी कर्मचा-यांना आज कामावर हजर राहण्याचे आदेश दिलेले असतानाही कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 

रायगड जिल्ह्यात एसटी कर्मचारी संप सुरूच आहे. पगारवाढीच्या घोषणेनंतरही कर्मचारी भूमिकेवर ठाम आहेत. मात्र काही आगारात कर्मचारी हजर झालेत. पेण आणि महाड आगारातून किरकोळ बससेवा सुरू झालीय. पनवेलसह ग्रामीण मार्गावर बससेवा सुरु झालीय. अन्य आगारातील बससेवा अद्यापही ठप्पच आहे. 
चालक वाहक यांच्यासह तांत्रिक व कार्यालयीन कर्मचारी मिळून जिल्हाभरात 250 कर्मचारी कामावर रुजू झालेत.