मुंबई : SSC HSC Re-Exam schedule declared : बातमी परीक्षेसंदर्भातील. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 10 वी फेरपरीक्षा 22 सप्टेंबरपासून तर 12 वी फेरपरीक्षा 16 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मुख्य परीक्षेत नापास, एटीकेटींसाठी फेरपरीक्षा होणार आहे. याचे शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा 10 वी आणि 12 वीची परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालातही अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आता नियमित लेखी परीक्षा होणार आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ते तुम्ही पाहू शकता.
व्यवसाय अभ्यासक्रम घेऊन बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होईल. तत्पूर्वी, दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.