राज्यात आता महाविद्यालयांत खास लसीकरण मोहीम, या तारखेपासून सुरुवात

Coronavirus in Maharashtra : राज्य सरकारने लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  

Updated: Oct 22, 2021, 07:06 AM IST
राज्यात आता महाविद्यालयांत खास लसीकरण मोहीम, या तारखेपासून सुरुवात title=
संग्रहित छाया

मुंबई : Coronavirus in Maharashtra : राज्य सरकारने लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यात महाविद्यालयामध्ये लसीकरणाचा स्पेशल ड्राईव्ह होणार आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान तरुणांचे लसीकरण होणार आहे. (Special vaccination campaign in colleges in Maharashtra from October 25th to November 2, 2021)

कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, लस आणि लसीकरणासाठी आवश्यक असणारे कर्मचारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर नियोजन केले जात आहे.

राज्यात उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या सुमारे पाच हजार संस्था आहेत. त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी, खासगी विद्यापीठे अशा सर्व संस्थात मिळून सुमारे चाळीस लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना या अभियानाच्या कालावधीत लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, या अभियानाच्या नियोजनाबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व्हिसीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत मिशन युवा स्वास्थ्यची अमंलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. युवकांचे लसीकरण केले जावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात महाविद्यालय परिसरातच विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरण कक्ष, विश्रांती कक्ष आणि निरीक्षण कक्ष उभारण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण कर्मचारी आणि लस उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी महाविद्यालयात कक्ष उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यार्थ्यांची माहिती प्राचार्याकडून संकलित केली जाईल, असे सांगितले.