कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : काही वर्षांपूर्वी एक टॉयलेट चोरीला गेले होते. आता त्याच पिंपरी चिंचवडमध्ये एक रस्ता चोरीला गेलाय. विश्वास बसत नाही ना पण हे घडलंय. हा स्पेशल रिपोर्ट...
रहाटणी काळेवाडी दरम्यानचा कच्चा रस्ता आहे. हाच रस्ता चोरीला गेलाय. येथे १८ मीटर डांबरी रस्ता हवा होता. कारण या रस्त्यासाठी लागणार ४९ लाख रुपयांचा निधी महापालिकेने ठेकेदाराला देऊन टाकलाय. एवढंच नाही तर हा रस्ता पूर्ण झाल्याचा दाखला ही संबंधित ठेकेदाराला देण्यात आलाय.
विशेष म्हणजे माहिती अधिकारात हे सर्व उघडं झालंय. मग पूर्णत्वाचा दाखला दिला असताना हा रस्ता गेला कुठे हा प्रश्न आपोआप उपस्तिथ होतो. त्यामुळे हा रस्ता चोरीला गेला का, असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जाऊ लागलीय.
दुसरीकडे महापालिका प्रशासनाने रस्ता पूर्णत्वाचा दाखला दिल्याचं मान्य केले आहे. ठेकेदाराला पैसे दिल्याचे ही मान्य केले आहे. पण जमीन मिळत नसल्यामुळं रस्ता रखडला आणि म्हणून महापालिकेने संबंधित ठेकेदाराकडून त्या पैशात इतर काम करून घेतल्याचा अजब दावा प्रशासनाने केलाय.
प्रशासनाने हा दावा केला असला तरी तो किती विश्वासार्ह आहे हे तुम्हीच ठरवलेलं बरे. पण एकूण काय तर महापालिकेचा कारभार असाच राहिला तर आगामी काळात शहरातून बरंच काही गायब होईल हे मात्र नक्की.