जयेश जगड, झी मीडिया, अकोला : खरीप हंगामासाठी 'महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ' अर्थातच 'महाबीज'ने यावर्षीच्या खरीप हंगामात तब्बल 8.16 लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन केलं. यामध्ये सर्वाधिक 7 लाख क्विंटलचा वाटा हा सोयाबीन बियाण्यांचा राहणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 2.20 लाख क्विंटल सोयाबीन बियाणं यावर्षी महाबीजनं बाजारात आणले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच 'महाबीज'नं स्वत:चं बीटी कापसाचं बियाणं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलं.
यावर्षीच्या खरीपासाठी 'महाबीज'ची तयारी पूर्ण झाली. 'महाबीज'चे 90 टक्के बियाणं सध्या बाजारात आलं आहे. मागच्या वर्षी हाच आकडा 5.97 लाख क्विंटल इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची संभाव्य वाढीव मागणी आणि पावसाला विलंब लक्षात घेता या पिकाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. यावर्षीही 'महाबीज' बियाण्यांमध्ये सर्वाधिक वाटा हा सोयाबीन बियाण्यांचा राहणार आहे. सोयाबीन बियाण्याचा वाटा यामध्ये 7 लाख क्विंटल इतका असणार आहे.
बियाणे विक्रीसाठी उपलब्ध (क्विंटलमध्ये)
१) सोयाबीन 7 लाख क्विंटल.
२) तूर 10 हजार क्विंटल
३) मुग 4300 क्विंटल
४) उडीद 15 हजार क्विंटल.
५) धान 72 हजार क्विंटल
६) हायब्रीड ज्वारी 11 हजार क्विंटल
७) बीटी कापूस 43500 पाकीटं
गेल्यावर्षीच्या तुलनेत 'महाबीज'च्या खरीप बियाण्याच्या उपलब्धतेत 2.20 लाख क्विंटल बियाणं अधिक आहे. यावर्षीही महत्वाच्या बियाण्यांवर सबसिडी आणि इतर लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा कार्यक्रम आणि राज्याच्या ग्राम बिजोत्पादन योजनेचा समावेश आहे.
ऐनवेळी मागणी वाढल्यास अतिरिक्त बियाण्यांची तयारी महाबीजनं ठेवली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत बियाण्यांच्या किंमती स्थिर ठेवण्याचं धोरण 'महाबीजनं अवलंबलं आहे. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच 'महाबीज'नं स्वत:चं बीटी कापसाचं बियाणं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलं. बीटी कापसाची 43500 पाकिटं बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
महाबीजने दर्जेदार बियाण्यांची गुणवत्ता टिकवून शेतकऱ्यांचा विश्वास मिळवला. येणाऱ्या काळात सुद्धा महाबीजनंही हा विश्वास जपत दर्जेदार बियाणे पुरवावे एव्हढीच माफक अपेक्षा.