राज्यात थंडी कमी होऊन तापमान वाढणार; पुढील दोन दिवस महत्त्वाचे

Weather Update In Maharashtra: राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. काही भागांत तापमानात घट झाली आहे. मात्र दोन दिवसांत पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 18, 2023, 11:34 AM IST
राज्यात थंडी कमी होऊन तापमान वाढणार; पुढील दोन दिवस महत्त्वाचे title=
Significant dip in temperature as Pune shivers

Weather Update In Marathi: डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून राज्यात थंडीची चाहुल लागली आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. मात्र, दोन दिवसांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतदेखील पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.

पुणेकर गेल्या दोन दिवसांपासून हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत. मात्र, २० डिसेंबरनंतर किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान रविवारी (दि. १७) शहरातील किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस इतके होते. तर पाषाण आणि एनडीए परिसरात थंडीचा जोर अधिक होता.

राज्यातील काही भागात विशेषतः गोवा परिसरात ढगाळ वातावरण आणि उत्तरेकडून येणारी थंड हवा मध्य प्रदेश व मध्य भारतातून राज्यात येत असल्याने पुढील २४ तासात गोव्यात हलका व अति हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबई आणि उपनगरातील किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. तर आणखी दोन दिवस रोज रात्री तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. त्यानंतर पुढील दोन दिवसांत ते पुन्हा 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. राज्यातही तापमानात मोठे बदल होत आहेत. दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारा येत असल्याने राज्यातील हवामानात मोठा बदल होईल. राज्यातील काही भागांमध्ये थंडी असणार आहे. तर मुंबईसह काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र पुढच्या दोन दिवसांमध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किमान तापमानात वाढ होऊ शकते असा अंदाज आहे

धुळे शहरात तापमानात घट

धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान गेल्या दोन दिवसांपासून झपाट्याने खाली आले आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 10° c पर्यंत खाली आला असून, यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. शहरात गारठा वाढला असून, सायंकाळी गार वाऱ्यांमुळे थंडीचे प्रमाण अधिकच जाणवत आहे. मागील आठवड्यापर्यंत तापमानाचा पारा 16 अंश सेल्सिअस पर्यंत होता. तो आता दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम जनजीवनावर होत आहे. उबदार कपड्यांची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उत्तरेकडे बर्फवृष्टी होऊ लागल्याने या भागात गार वारे वाहत आल्याने शहरात थंडी वाढले असल्याचं तज्ञांचे मत आहे. आगामी काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा दहा अंश किंवा त्यापेक्षा कमी राहू शकतो असा अंदाजही हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे