प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : गाव पाणीदार केल्याशिवाय लग्न करणार नाही असा अनोखा संकल्प सरपंच अलका पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यात दुष्काळाच्या झळा बसत असताना वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी सरपंचपद भूषवलेल्या अलका पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील वीरपूर गावातील सरपंच अलका पवार यांनी गावकऱ्यांना श्रमदानाचे महत्व पटवून दिले आहे. त्यांनी गावातील अबालवृद्धांना श्रमदानासाठी एकत्रीत केले आहे. स्वत:च्या लग्नाचा विचार न करता सरपंच अलका यांचा गाव पाणीदार करण्याकडे कल आहे. सर्वात आधी गावातील दुष्काळाशी दोन हात करायचे, त्यानंतर स्वत:चा विचार करायचा असा निर्धार अलका यांनी केला आहे.
'तू घरी चल, तुला बघायला पाहुणे आले आहेत.' असे वक्तव्य त्यांच्या वडिलांकडून करण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ लग्नाला नकार दिला. 'त्यांना सांगा, २३ मे नंतर या... मला माझं गाव पाणीदार करायचं आहे.' असे त्या म्हणाल्या. वडील आणि त्यांच्यातील संभाषण आपल्या जबाबदारी विषयी किती समर्पित आहे हे दर्शवणारा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पाणी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
सुरवातीला फक्त पाच साथीदारांच्या सोबतीने अलका श्रमदान करत होत्या. पण आता त्यांच्यासोबत संपूर्ण गाव एकजुटीने काम करत आहे. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी लहान मुले त्याचबरोबर गावातील कष्टकरी वर्गसुद्धा या संकल्पनेत सहभाही झाला आहे. 'आधी लग्न पाण्याचे नंतर आपले' असा निर्धार सरपंच अलका यांनी केला आहे.
दरवर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आराखडा तयार होतो. त्यात गावासाठी उपाययोजना केल्या जातात. मात्र त्या उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. या भयंकर पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी अलका यांनी 'पाणी फाउंडेशन'सह काम करण्यास सुरूवात केली आहे.