तुळशीरामसाठी 40 हजार खर्च करुन प्लास्मा आणला पण डॉक्टरांनी तुळशीदासला दिला, धक्कादायक प्रकार

आरोग्य यंत्रणेचा कारभार

Updated: Apr 7, 2021, 05:20 PM IST
तुळशीरामसाठी 40 हजार खर्च करुन प्लास्मा आणला पण डॉक्टरांनी तुळशीदासला दिला, धक्कादायक प्रकार title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोगय विभागाकडून एका रुग्णासाठी मागविलेला प्लास्मा भलत्याच रुग्णाला चढविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी या कोविडवर उपचार देणाऱ्या रुग्णालयात हा प्रकार घडला. 

तुळशीराम नावाच्या रुग्णाला प्लास्माची आवश्यकता असल्याने त्याच्या नातेवाईकांनी पुण्यातून मोठ्या जिकरीने प्लास्मा उपलब्ध करून पुरविला होता. तुळशीरामला अधिक प्लास्माची गरज असल्याने भांडुप येथून ४० हजार खर्च करून प्लास्मा आणला होता. इथे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला.

तुळशीरामसाठी आणलेला प्लास्मा गरज असलेल्या तुळशीरामला न देता तो तुळशीदास या रुग्णाला दिला आहे. नावामुळे हा घोळ झाल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. पण असा प्रकार म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचे घडलेला प्रकार गंभीर आहे. 

धक्कादायक म्हणजे ज्या तुळशीदासला प्लास्मा देण्यात आलाय त्याचा कोविडचा रिपार्टही अद्याप आला नाहीय. त्यामुळे या घटनेनंतर तुळशीराम आणि तुळशीदास या दोघांच्याही नातेवाईकांडून संताप व्यक्त होतोय. 

कोणत्या रुग्णाला प्लासमा दिला गेला आहे आणि कोणत्या रुग्णाला त्याची आवश्यकता होती याची तपासणी करत आहोत असं स्पष्टीकरण संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहे.

शिवाय ज्या रुग्णाला प्लास्माची आवश्यकता होती त्यास लवकरात लवकर प्लास्मा उपलब्ध करून देणार आहोत.

या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ.तेजश्री सोनवणे यांनी सांगितले आहे.

मात्र आवश्यकता नसलेल्या रुग्णाला दिलेल्या प्लासमाचा काय परिणाम होईल ? यावर विचारले असता त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.