पुणे : पुण्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथे एक मजनू जबरदस्ती महिलेच्या घरी घुसून स्वत:वर प्रेम करण्यासाठी धमकी देत आहे. हा व्यक्ती जबरदस्तीने महिलेच्या घरात शिरुन तिला मारहाण करुन तू जर माझ्यावर प्रेम नाही केले तर आपल्या प्रेमसंबंधाबाबत तुझ्या नवर्याला आणि नातेवाईकांना सांगून तुझी बदनामी करेन, अशी धमकी देऊ लागला. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणार्या ‘मजनू’वर हडपसर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी फुरसुंगीतील एका ३० वर्षाय विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ज्यानंतर पोलिसांनी या मजनूला अटक केली आहे. यश अंकुश वाघमारे असे या मजनूचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबरला सकाळी ही महिला आपल्या घरी असताना हा आरोपी जबरदस्तीने घरात शिरला आणि तिला जवळ खेचू लागला. त्यानंतर या महिलेनं प्रतिकार केला. परंतु यानंतर या मजनूला आपला राग अनावर झाला, ज्यामुळे त्याने या महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करायला सुरूवात केली.
त्यानंतर तो रागाने या महिला म्हणाला, "तू जर माझ्यावर प्रेम केले नाहीस तर आपल्या प्रेमसंबंधाबाबत तुझ्या नवर्याला आणि नातेवाईकांना सांगून तुझी बदनामी करेन." असे म्हणत या मजनूने धमकी दिली.
त्यानंतर आरोपी मजनू ८ नोव्हेंबर रोजी या महिलेच्या घरी पुन्हा आला आणि मला तू खूप आवडतेस आणि माझ्यासोबत लॉजवर चल असे बोलून तिचा विनयभंग केला. त्यानंतर मात्र शांत न राहाता या महिलेनं पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.
या महिलेनं नंतर संपूर्ण प्रकरण तिच्या नवऱ्याला आणि भावाला सांगितले आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणा अंतर्गत पोलिस पुढील तपास करत आहेत.