22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात नव्हे तर 'या' मंदिरात जाणार उद्धव ठाकरे

प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना उद्धव ठाकरे तिथे उपस्थित राहणार का? याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

Updated: Jan 20, 2024, 10:24 PM IST
22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात नव्हे तर 'या' मंदिरात जाणार उद्धव ठाकरे title=

Uddhav Thackeray Ram Mandir inauguration : येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. यामुळे सध्या सर्व देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.  या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अखेर आज ऐनवेळी उद्धव ठाकरे यांना राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अयोध्येसह संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या जय्यत तयारीही पाहायला मिळत आहे. याच निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टकडून त्यांना हे निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांना कुरिअरद्वारे ही निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. 

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी यांनी एका पत्रकार परिषदेवेळी 22 जानेवारीला ते नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार असल्याचे सांगितले होते. येत्या 22 जानेवारीला उद्धव ठाकरे मातोश्रीवरून सकाळी 11 वाजता निघणार आहेत. ते विमानाने ओझर विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर ते भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन सावरकरांना अभिवादन करणार आहेत. यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरात दर्शन घेऊन त्याठिकाणी पूजा करणार आहेत. तसेच 6.30 वाजता गोदा घाटावर येऊन गोदावरीची महाआरतीदेखील करणार आहेत.

उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार?

उद्धव ठाकरेंचा हा दौरा पूर्वनियोजित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे निमंत्रण स्वीकारुन आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन ते अयोध्येत जाणार का? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्याबरोबरच ते आपला एखादा प्रतिनिधी अयोध्येत पाठवणार किंवा इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्षांप्रमाणे हे निमंत्रण नाकारणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

दरम्यान अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा त्यात शिवसेनेचा मोलाचा वाटा होता, असा दावा उद्धव ठाकरेंकडून वारंवार केला जातो. त्यामुळे आता त्या जागी राम मंदिर उभं राहत आहे. त्यात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना उद्धव ठाकरे तिथे उपस्थित राहणार का? याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.