मुंबई : शिवसेनेचा 53 वा वर्धपान दिन मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात नुकताच पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीतील युतीचा अभूतपूर्व विजय तसेच आगामी विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची शिवसेनेच्या वर्धापन दिनाला उपस्थिती ही चर्चेचा विषय बनली होती. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाचा ? या प्रश्नाची खलबत शिवसेना आणि भाजपाच्या गोटात सध्या सुरु आहेत. या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख काय भाष्य करतात ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
शिवसेनेने वर्धापन दिनी आमंत्रित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. एखाद्या पक्षाच्या वर्धापन दिनाला दुसऱ्या पक्षाच्या नेत्यास बोलावण्याची आपल्याकडे परंपरा नाही. पण 53 व्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. या इतिहासाचा भाग होण्याची संधी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात महायुती, राम मंदीर, दुष्काळ असा विविध प्रश्नांना हात घातला. यावेळी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. तसेच मुख्यमंत्र्यांचे आभार मानत तुम्हीही कार्यक्रम घ्या, तिथं मीही येतो..म्हणजे सगळं समसमान पाहिजे..असे उद्गार काढले. या वाक्यानंतर सभागृहात उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्या वाजवत दाद दिली. उद्धव ठाकरे यांचे हे विधान म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीचे संकेत मानले जात आहेत.
- आम्ही हिंदू आहोत म्हटल्यावर काही जणांना पोटशूळ उठतो
- समान भागीदार असाल तर वंदे मातरम म्हणायला लाज का वाटते
- मुख्यमंत्र्यांना इथं बोलवले तर इतरांच्या पोटात काय दुखतं ?
- मधल्या काळातील दुरावा नाहीसा झालेला आहे
- एकमेकांशी भांडून आता माती होवू द्यायची नाही
- ' एका युतीची पुढची गोष्ट' आता सुरू झालेली आहे
-तुम्हीही कार्यक्रम घ्या, तिथं मीही येतो..म्हणजे सगळं समसमान पाहिजे..