आमच्यामुळे सत्तेत आले आणि आता... शिवसेना आमदाराची काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका

आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय... सरकारला घरचा आहेर

Updated: Mar 28, 2022, 05:47 PM IST
आमच्यामुळे सत्तेत आले आणि आता... शिवसेना आमदाराची काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका title=

सोलापूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळतेय, अशा शब्दांत शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी घरचा आहेर दिला आहे. ज्यांच्यामुळं सत्ता, त्यांच्यावरच अन्याय करता? असा सवालही त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला केला. 

आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही... भाजपच्या काळातही अन्याय होत होता आणि आताही तेच होतंय, अशी व्यथा त्यांनी सोलापुरात युवा सेना मेळाव्यात बोलताना त्यांनी व्यक्त केली.

आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करता, हे आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. 

शिवसेनेला नेहमी दुय्यम वागणूक मिळते, राष्ट्रवादीला ६०-६५ टक्के बजेट, काँग्रेसला ३०-३५ टक्के आणि उरलेले १६ टक्के शिवसेनेला, त्यातही पगार काढावे लागतात, विकास कामाला केवळ १० टक्के मिळतात, असं सांगत तानाजी सावंत यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचा साधा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपयांचा निधी आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो, आम्हाला केवळ गोड बोललं जातं, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. 

ही सत्ता तुम्ही स्वप्नात पाहिली होती का? एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असं ठरलेलं असताना का असं होतं, आमच्या नादाला लागू नका , तुम्ही शंभर मारले, पण आमचा एकच दणका बसला तर आईचं दूध आठवेल, केवळ अपमानच होणार असेल तर साहेब वेगळा विचार करायला हवा, अशी भावनाही तानाजी सावंत यांनी व्यक्त केली.