शिंदे गटाच्या आमदाराची गाडी फोडली, घटनास्थळी तणावाचे वातावरण

काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. 

Updated: Mar 17, 2024, 03:57 PM IST
शिंदे गटाच्या आमदाराची गाडी फोडली, घटनास्थळी तणावाचे वातावरण title=

Balaji Kalyankar Car Attack : नांदेड उत्तर मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. बालाजी कल्याणकर हे अर्धापूर तालुक्यातील देगावमधील कुराड या गावात एका लग्न सभारंभासाठी गेले होते. त्यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. 

नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा या ठिकाणी एका लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी बालाजी कल्याणकर आणि त्यांचे काही सहकारी हे गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली गाडी कार्यक्रम स्थळाबाहेर लावली होती. त्यानंतर ते नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी गेले. पण यादरम्यान काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यादरम्यान त्यांच्या गाडीची मागील काच आणि बाजूच्या दोन्हीही काचा फुटल्या. यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

सुदैवाने कोणतीही दुखापत नाही

पण सुदैवाने यावेळी बालाजी कल्याणकर किंवा इतर कोणीही गाडीत नव्हते. त्यामुळे कोणालाही दुखापत झालेली नाही. पण या दगडफेकीत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठा आंदोलकांनी बालाजी कल्याणकर यांच्या कारची काच फोडल्याचं बोललं जात आहे. पण अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण नेमकं हे कृत्य कुणी केलं हे अद्याप समोर आलेलं नाही.

कोण आहेत बालाजी कल्याणकर? 

नांदेड जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये विजयी झाले. त्यांच्या आमदारकीची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी ते नांदेड महानगरपालिकेत नगरसेवक होते. विशेष म्हणजे नांदेड महानगरपालिकेत देखील कल्याणकर हे एकमेव शिवसेनेचे नगरसेवक होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघातून शिवसैनिकालाच उमेदवारी देण्याची मागणी होऊ लागली. अशात एक कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या बालाजी कल्याणकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांचा सामना थेट काँग्रेसचे बडे नेते डी. पी. सावंत यांच्यासोबत झाला. पण नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात एमआयएमने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला. त्यामुळे, मुस्लीमबहुल भाग असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसची मते विभागली गेली. याचा फायदा बालाजी कल्याणकर यांना झाला.