आता शिक्षकांनाही असणार ड्रेसकोड! शालेय शिक्षण विभागाच्या सूचना

School Teachers Dress code:  शिक्षकांचा दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा? याबाबत शालेय शिक्षण विभागाने काय मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 17, 2024, 12:34 PM IST
आता शिक्षकांनाही असणार ड्रेसकोड! शालेय शिक्षण विभागाच्या सूचना title=
School Teacher Dress Code

School Teachers Dress code: शालेय विद्यार्थी ज्याप्रमाणे शाळेच्या विशिष्ट पेहरावात दिसतात, त्याप्रमाणे आता शिक्षकही दिसणार आहेत. कारण शिक्षकांना आता ड्रेसकोडू लागू होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून याप्रकारचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित/अंशत: अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना निर्देश लागू होणार आहेत.. राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांचा दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा? याबाबत शालेय शिक्षण विभागाने काय मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊया. 

शाळेत जीन्स,टी शर्ट नको

शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा. सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे आणि चित्रविचित्र नक्षीकाम / चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स, टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये, असे म्हटले आहे. 

पेहरावाचा रंग

परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी. तसेच शाळेला सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरवावा लागणार आहे. पुरुष आणि महिला शिक्षकांकरीता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग संबंधित शाळेलाच निश्चित करावा लागणार आहे. पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा. महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे (उदा. पुरुषांनी शूज) यांचा वापर करावा लागणार आहे.

स्काऊट गाईड च्या शिक्षकांना स्काऊट गाईडचेच ड्रेस राहणार आहेत. तर वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना / महिला शिक्षकांना बूट ( शूज ) वापरण्यातून सवलत देण्यात येणार आहे. 

नावाआधी Tr संबोधन 

राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत 'Tr' तर मराठी भाषेत 'टी' असे संबोधन लावण्यात येतील, असे निर्देश दिले आहेत.  या सर्व नियमांची शिक्षकांकडून अंमलबजावणी होईल पण शिक्षकांना सध्या वेगळ्या विषयांची काळजी आहे, त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होतंय. नव्या शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणीसाठी लागणारे प्रशिक्षण, क्रीडांगण, शाळा इमारत व्यवस्थापन निधी, संगीत, कला, शारीरिक शिक्षक नियुक्ती, अनुदान यासारख्या महत्त्वाच्या विषयावर परीपत्रक कधी निघते? याकडे शिक्षक वर्गाचे लक्ष लागले आहे.