या नगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा, विरोधी पक्षच नाही

अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय.

Updated: Nov 19, 2017, 10:32 PM IST
या नगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा, विरोधी पक्षच नाही  title=

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अंबरनाथ नगरपालिकेत विरोधी पक्षच राहिलेला नाही. शिवसेनेतर्फे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पत्नी मनीषा वाळेकर यांनी एकमेव अर्ज दाखल केला.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशा सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. २०१० साली अंबरनाथमध्ये शिवसेना-मनसे युतीचा अंबरनाथ पॅटर्न गाजला होता. तर आता पालिकेतून विरोधी पक्षच गायब झालाय. यावर विकासाच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी पाठींबा दिल्याचं शिवसेनेनं म्हटलंय.

शिवसेनेला मदत करण्याच्या मोबदल्यात काँग्रेसला पालिकेचं उपनगराध्यक्षपद मिळणार असल्याचीही चर्चा सध्या अंबरनाथ शहरात आहे. तर बदलापूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनाकडूनच एकमेव अर्ज आल्यानं, पुन्हा एकदा शिवसेनेचाच नगराध्यक्ष बदलापूर नगरपालिकेत विराजमान होणार आहे.

बदलापूर नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे दिवंगत उपशहरप्रमुख मोहन राऊत यांच्या पत्नी विजया राऊत यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या दोन गटातल्या संघर्षाचा फायदा इतर पक्षांना होऊ नये यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घेत, विजया राऊत यांच्या नावाला प्रथम पसंती दिली आहे.