Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच पुणे जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. पुण्यातील शिवसेनेचे निष्ठावान समजले जाणारे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी देखील पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत संजय राऊत, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी 56 वर्षांचा स्वाभिमान बारामतीच्या दावणीला बांधला अशी बोचरी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भाजपसोबत सरकार स्थापन करावं अशी बूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली, पण त्याला प्रतिसाद न देता उलट नकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर आरोप करण्यात आले अशी टीका शिवतारे यांनी केली.
गेल्या निवडणुकीत 52 विधान सभेच्या मतदार संघात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. काँग्रेस, राष्ट्रवादीने आमचा पराभव केला, काँग्रेस राष्ट्रवादीकडून आम्हाला दाबलं जात असताना, आम्हाला जगू द्या अशी भूमिका घेतली, मात्र ती ऐकली गेली नाही असा आरोप शिवतारे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंना घेरलं जात आहे, आम्ही शिवसेनेबरोबर आहोत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत मात्र महाविकास आघाडी सोबत राहणार नाही असं सांगत शिवतारे यांनी 51 आमदारांनी सांगूनही उद्धव ठाकरे चक्रव्यूहातून बाहेर पडत नसल्याचं म्हटलं आहे.
आम्ही उद्धव ठाकरेंना मानतो, आदित्य ठाकरेंना मानतो. शिवसेनेत आहोत असंही शिवतारे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंना पाय उतार व्हावं लागणे वेदनादायी आहे, दुःखद आहे. परंतु लोकांच्या हीता साठी, संघटनेच्या हितास्तव हे करणे गरजेचे आहे असं शिवतारे यांनी म्हटलं आहे.
गुवाहाटीला जाऊन त्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतो असा मेसेज मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना पाठवला होता. त्याला काही उत्तर आलं नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर राहून हिंदुत्वाचा विचार होऊ शकत नाही, गेली 2 वर्षे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू होता असा आरोपही शिवतारे यांनी केला आहे.