Shivsena-Bjp Conflict: कल्याण-डोंबिवली मतदारसंघावरुन शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा पडला होता. पण सह्याद्री अतिथीगृहातील चहापानाने या वादाचा शेवट गोड झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीमधील वाद मिटवला आहे. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात अत्यंत महत्वाची बैठकझाली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधण्यात आला.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघात स्थानिक भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांनी शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद निर्माण झाला होता. या वादावर अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच तोडगा काढलांय. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पालघर येथील कार्यक्रमात डोंबिवलीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून सबुरीचा सल्ला देत युती धर्माचे पालन करण्यास सांगितले. युती धर्माचे पालन करण्याची समज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपापल्या नेत्यांना दिली.
त्यानंतर आजच संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशीही चर्चा केली आणि युती धर्माचे पालन करण्यास सांगितले. शिवसेना-भाजपा युतीत झालेल्या वादावर अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच दोन्ही नेत्यांना सबुरीचा सल्ला देत युती धर्माचे पालन करण्यास सांगितले.