Maharashtra Politics : ललित पाटीलप्रकरणी आधीच पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushama Andhare) ट्विट केलेल्या व्हिडीओने एकच खळबळ माजलीये. सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये कैद्यांना घेऊन जाणारी गाडी अज्ञात स्थळी थांबवण्यात आल्याचं दिसतंय. त्यानंतर पोलिसांसमोरच कैद्यांशी संबंधीत काही व्यक्ती कैद्यांना पाकीटं देत असल्याचं दिसतंय. पोलिसांच्या कारभाराकडे बोट दाखवत सुषमा अंधारेंनी हा व्हिडीओ पुण्यातील असल्याचा दावा केलाय. हा व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला आहे.
"उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली पुन्हा एकदा गृहकात्याची अब्रू चव्हाट्यावर आली" म्हणत सुषमा अंधारे यांची फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हा व्हिडिओ पुण्यातील जेल रोडचा (Pune Jail Road) असून कारागृहात घेऊन जाणाऱ्या कैद्यांना पोलिसांनी पाकिटे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी पोलीस आणि गृह खात्यावर केला आहे.
याआधीही फडणवीसांवर टीका
याआधीही सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. भाजपचा शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न असून शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत असा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. भाजप शिंदे गटाला संपवत असून हा देवेंद्र फडणवीस यांचा ट्रॅप असल्याचा आरोप अंधारे यांनी केला होता.
भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करतोय. देवेंद्र फडणवीस यांना शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत असा दावा देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या पंढरपुर येथे बोलत होत्या. भाजप पक्ष वाढवायचा आणि मग थेट मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकायचा अशी खोचक टिका देखील सुषमा अंधारे यांनी केली होती.
आदित्य ठाकरेंचा बीएमसीला दणका
मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा कंत्राटदारांसोबतचा करार अखेर रद्द करण्यात आलाय. कार्यादेश दिल्यानंतर 10 महिने उलटूनही काम सुरू न केल्यामुळे कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्याच्या प्रस्तावाला बीएमसीने मंजुरी दिली. याबाबत आदित्य ठाकरेंनी कंत्राटदारावर अनेक सवाल उपस्थित करून बीएमसीला जाब विचारला होता. 1687 कोटी रुपयांचं हे कंत्राट या संबंधित कंत्राटदाराला रस्ते काँक्रिटीकरनाच्या कामासाठी देण्यात आलं होतं. याबाबत बीएमसीने संबंधित कंत्राटदाराला नोटीस पाठवून सुनावणीसाठीही बोलावलं होतं. मात्र कंत्राटदार सुनावणीसाठी हजर राहिला नाही. त्यामुळे बीएमसीने कंत्राटदाराला दणका देत 52 कोटी रुपयांच्या दंडही ठोठावलाय.