औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाने आमदार अर्जुन खोतखरांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी निवडणूक अर्ज वेळेत न भरल्याने त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका कैलाश गोरंट्याल यांनी दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नलावडे यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदार पद अपात्र घोषित केले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी खोतकर यांनी वेळ निघून गेल्यानंतर स्थानिक उपविभागीय अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास पात्रच नव्हते, असे याचिकेत नमूद होते.
या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. २०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये खोतकर केवळ २९६ मतांनी विजयी झाले होते. दरम्यान, यावर एक महिन्याचा स्टे दिला असून आपण या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
अर्जुन खोतकर हे मराठवाड्यातील शिवसेनेचे मोठे नेते असल्याने सेनेनाल हा मोठा धक्का मानला जात आहे. जालना जिल्ह्यात अर्जुन खोतकरांनी शिवसेना चांगलीच मजबूत केली आहे. त्यामुळे या नेत्याची आमदारकी रद्द होणे शिवसेनेला मोठा दणका मानला जात आहे. आता ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून यावर काय निर्णय येईल याकडे सर्वांचे लक्ष असेल.