Shishir Shinde Letter to Eknath Shinde: शिवसेना उपनेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. गजानन कीर्तिकर यांची पक्षविरोधी वक्तव्यं केल्याप्रकरणी त्वरीत शिवसेनेतून हकालपट्टी करून त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान यावर गजानन कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया देताना पक्षाच्या बैठकीत मी पक्षाविरोधात जाणार नाही असं सांगितलं होतं. पण कोणीतरी चुगली, संशय व्यक्त करणार असेल तर ते मला चालणार नाही असं म्हटलं आहे.
गजानन कीर्तिकर यांनी झी 24 तासवर पत्रावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "आमचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याविरोधात किंवा मुलगा अमोल कीर्तिकर यांच्या बाजूने मी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. यासंदर्भात माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही. जर कोणाकडून संशय व्यक्त केला जात असेल तर मला पर्वा नाही. पक्षाच्या बैठकीत मी पक्षाविरोधात जाणार नाही असं सांगितलं होतं. पण कोणीतरी चुगली करणार, संशय व्यक्त करणार हे मला चालणार नाही. तशाच पद्धतीने माझ्या कृतीकडे पाहणार असतील तर पक्षाने व्यवस्थित माहिती, स्पष्टीकरण घ्यावं आणि नंतर निर्णय घ्यावा",
त्याचवेळी शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे की, "ते आमचे नेते आहेत. त्यांनी शिवसैनिकांसमोर आदर्शवत वागलं पाहिजे. गजानन किर्तीकर यांनी तसंच वागलं पाहिजे. आम्हाला त्यांच्याकडून तशीच अपेक्षा आहे. मात्र त्यांनी एकनाथ शिंदेंनी अमोल किर्तीकर यांना आमिषं दाखवली, विधान परिषद देतो असं सांगितलं. पण अमोल कीर्तिकर बधले नाहीत हे सांगण्याची गरज नव्हती. अमोल किर्तीकर त्यांचे चिरंजीव आहेत, तुम्ही त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण आपल्या नेत्याची बदनामी कशाला करायची. आम्ही दोघं शिवसेनेचे कार्यकर्ते , शिवसैनिक आहोत. मी शिस्तीत वागणारा कार्यकर्ता आहे. ती शिस्त नेत्यांनी घालून दिली पाहिजे. त्यापद्धतीने त्यांनी वागलं पाहिहजे. पक्षहिताला बाघा, शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असं शिवसेनेच्या नेत्यांनी वागू नये".
"शिशीर शिंदे माझे जुने सहकारी आहेत. ज्या पक्षशिस्तीत मी वाढलो, तिथेच ते वाढले. अमोल कीर्तिकर निष्ठावंत असून, एकनाथ शिंदे यांनीही भेटून येण्याचं, विधानपरिषद देण्याचं आमंत्रण दिलं होतं असं मी सांगितलं होतं. त्यामुळे पक्षशिस्त बिघडली असं मी समजत नाही," असं गजानन कीर्तिकर म्हणाले आहेत. यावर शिशिर शिंदे यांनीही मला स्पष्ट सागांयचं आहे की, आमच्यात कोणतीच स्पर्धा नाही. पक्षाचं नुकसान होईल अशी कोणतीही भावना मनात नाही. एकनाथ शिंदे यावर भूमिका घेतील आणि गजानन किर्तीकर यांच्याशी बोलतील. आम्ही आपापसात वाद घालणं हेदेखील पक्षशिस्तीला शोभणारं नाही असं सांगितलं आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्यं करून विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतली. त्यामुळे मातोश्रीचे “लाचार श्री” होणाऱ्यांना पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनीएकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
"गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनतर अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेंच गजानन कीर्तिकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार नीधी अमोल किर्तीकर यांनी स्वत: च्या प्रचारासाठी विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला. परवा मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती. गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन किर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आता गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा," असं शिशिर शिंदे म्हणाले आहेत.