म्हाडाच्या घरासाठी तिने ठेवला विश्वास, पण तिला मिळाला 'लव्ह, सेक्स और धोका'

म्हाडामध्ये घर मिळवून देतो असे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Updated: May 26, 2022, 07:30 PM IST
म्हाडाच्या घरासाठी तिने ठेवला विश्वास, पण तिला मिळाला 'लव्ह, सेक्स और धोका' title=

पुणे : म्हाडामध्ये घर घेऊन देतो असे सांगून 57 लाखांची फसवणूक करणाऱ्या संतोष पवार या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत एका महिलेने फिर्याद दाखल केली आहे. आरोपीने केवळ त्या महिलेची आर्थिक फसवणूक केली नाही तर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्याचीही तक्रार त्या महिलेने केली आहे.

विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पवार याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 'माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशी लग्न करणार आहे. तुझा व तुझ्या मुलाचा सांभाळ करेन अशी आश्वासने देऊन फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरीक संभोग केला.

यानंतर आरोपीने म्हाडामध्ये घर मिळवून देतो असे आमिष फिर्यादीला दाखविले. म्हाडामध्ये फ्लॅट घेण्यासाठी धानोरी, माणगाव येथील जमिन आणि चाकण येथील फ्लॅटची मुळ कागदपत्रे लागणार आहेत असे त्या महिलेस सांगितले.

म्हाडा येथील घर घेण्यासाठी काही पैशांची गरज आहे असे सांगून आरोपीने महिलेकडून वेळावेळी पैसे उकळले. एकूण 41 लाख 68 हजार 700 रुपये रॅक आणि अंदाजे 16 लाख रुपयांचे 40 तोळे सोने असे एकूण 57 लाख 68 हजार 700 रुपये आरोपीने महिलेकडून घेतले.

आरोपीने त्या महिलेकडून जागेचे धानोरी, माणगाव येथील जमिनीचे सत्य प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र जबरदस्तीने लिहून घेतले. मात्र, अनेक महिने उलटल्यानंतर फिर्यादी महिलेने आरोपीकडे पैसे, कागदपत्रे परत मागितले असता आरोपीने पैसे देण्यासाठी त्यांना बोलावून घेतले. यावेळी आरोपीने माझ्याविरोधात तक्रार केल्यास नग्न फोटो व व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी दिली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संतोष पवार ( रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2020 ते जानेवारी 2022 दरम्यान घडला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.