Sharad Pawar : 'मागील 15 दिवसांत अचानक...', बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात...

Bihar Politics :  हरियाणाच्या 'आया राम, गया राम'लाही मागे टाकून नितीश कुमार यांनी स्वतःचा मार्ग दाखवला, अशी बोचरी टीका शरद पवारांनी (Sharad Pawar On Nitish Kumar) केली.

सौरभ तळेकर | Updated: Jan 28, 2024, 11:10 PM IST
Sharad Pawar : 'मागील 15 दिवसांत अचानक...', बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात... title=
Sharad Pawar Statement,Bihar political crisis

Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. अशातच आता बिहारच्या राजकारणावर देशभर चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाले शरद पवार?

बिहारमध्ये जी काही राजकीय उलथापालथ झालीये, ती अतिशय कमी दिवसात झाली. याआधी अशी परिस्थिती कधी पाहिली नव्हती. दोन महिन्यांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. नितीश कुमार यांनी स्वत: विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि इतर अध्यक्षांना निमंत्रण दिलं होतं.  मात्र मागच्या १५ दिवसांत अचानक काय झाले? याची मला कल्पना नाही. त्यांनी त्यांची विचारधारा का सोडली? याबाबत कळायला मार्ग नाही. आज त्यांनी अचानक भाजपाबरोबर सरकार स्थापन का केलं? याची मला काही कल्पना नाही, असं शरद पवार म्हणाले आहे.

पूर्वी हरियाणाचं उदाहरण दिलं जायचं. तिथं 'आया राम, गया राम' ही संज्ञा पहिल्यांदा वापरली जात होती. पण हरियाणाच्या 'आया राम, गया राम'लाही मागे टाकून नितीश कुमार यांनी स्वतःचा मार्ग दाखवला, अशी बोचरी टीका शरद पवारांनी केली. पुढील निवडणुकीत लोक मतदान करायला मतदान केंद्रावर जातील. तेव्हा या सर्व प्रकाराला प्रत्युत्तर देतील, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

नितीश कुमार काय म्हणाले?

मागील विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या लोकांकडून मिळालेल्या मतांनुसार, मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. आम्ही पूर्वीची आघाडी (एनडीए) सोडून नवीन आघाडी केली होती, मात्र त्यात परिस्थिती योग्य वाटत नाही आमच्या लोकांना त्रास होत होता. ते मेहनत घेत होते. परंतु, काही गोष्टींचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोहोचलो, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी थेट नाराजी देखील व्यक्त केलीये.

मंत्रीपदाची शपथ घेणारे मंत्री -

सम्राट चौधरी (भाजप)
विजय कुमार सिन्हा (भाजप)
डॉ. प्रेम कुमार (भाजप)
विजय कुमार चौधरी (जेडीयू)
बिजेंद्र प्रसाद यादव (जेडीयू)
श्रावण कुमार (जेडीयू)
संतोष कुमार सुमन (HAM)
सुमित कुमार सिंग (अपक्ष)