मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यानंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आरोप-प्रत्त्युर पाहायला मिळत आहे. आता काही काँग्रेस नेत्यांच्या जाहीर वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नाराजी नाट्य दिसून येत आहे. ज्यांनी ही आघाडी बनविण्यासाठी पुढाकार घेतला तेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पवारांची नाराजी दूर करण्याची प्रयत्न सुरु आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची काँग्रेस नेत्यांनी भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी निर्माण झाली होती. शरद पवार यांनीही आपण लहान नेत्यांबाबत प्रतिक्रिया देत नाही, असे म्हटलं होते. त्यापार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आज शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली. विरोधकांनी हा मुद्दा उचलून आघाडी सरकावर टीका केली. यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे हे कसले सरकार चालवणार, असा टोला विरोधकांनी लगावला. आघाडी सरकारमधील घटक पक्षच विरोधकांना कळीचा मुद्दा हाती देत असतील ते योग्य नाही, अशी प्रतिक्रिया आघाडीतील घटक पक्षांतून उमटत आहे.
त्याचवेळी नाना पटोले यांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा केलेला आरोप हा माहितीअभावी केलेला आहे. सरकार कोणाचंही असो, आंदोलन, बैठका, जेव्हा असतात तेव्हा पोलीस विशेष विभाग ही माहिती संकलित करत असतो, पक्ष कोणताही असो ही माहिती घेण्याचं काम गृहविभाग करत असतो, सुरक्षेच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष असतं, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांना जर हे माहित नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली पाहिजे असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्रीपद (दिलीप वळसे-पाटील)हे माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले होते. स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार, असाही आरोप यावेळी त्यांनी केला होता.