मुंबई : भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात यावर्षी सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीबाबत कोणतीही आस्थान नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आताच्या सरकारने शेतकरी आणि उद्योगांचे मोठे नुकसान केले. सरकारच्या धोरणामुळे कारखाने बंद पडले, लोकांचे रोजगार गेलेत. मात्र, देशातल्या मोठ्या धनिकांनी बँकांचे पैसे थकवले आणि सरकारने मात्र या बँकांची ७८ हजार कोटींची थकबाकी भरली. त्यांनी सगळ्यांचेच नुकसान केले आहे. अशा लोकांना मतदानासाठी दारात उभे करु नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
अहमदनगरमध्ये शरद पवारांची पहिली जाहीर प्रचार सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यांनी सरकारच्या उद्योग आणि शेतकरी विषयक धोरणांवर कडाडून हल्लाबोल चढवला. नोटबंदीच्या निर्णयानंतर सगळा देश पंतप्रधान मोदींनी बँकांच्या बाहेर उभा केला, या रांगात अनेक लोकांचे बळी गेले, निर्णयाचा काहीच फायदा झाला नाही. उलट नोटबंदी होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधित लोकांनी काळ्या पैशांची विल्हेवाट लावली, असा आरोप पवार यांनी यावेळी केला.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली, त्यावेळी कांदा निर्यातबंदीचा निर्णय सरकारने घेतला. आम्ही सत्तेत असताना आम्ही एकाच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत होतो, पण आताच्या सरकारने अनेक विमा कंपन्या काढून सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, अशा सरकारला चांगला धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ईडी चौकशीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले आणि आता माझ्यापर्यंत सुद्धा आले. काय वाटेल ते करा. आमच्यावर खटले भरा नाहीतर आम्हाला तुरुंगात टाका. सामान्य जनता, शेतकरी, कामगार यांचे काम करत राहणार, असे पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी पक्षचा त्याग करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत गेलेल्या नेत्यांचा चांगलाच समाचार पवार यांनी यावेळी घेतला. पक्ष बदलणाऱ्यांची मला चिंता नाही, आमचीही त्यांच्यापासून सुटका झाली, असे ते म्हणालेत.