Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?

Akaluj Madha Meet Up On Shivratna : माढामध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील असे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन-तीन दिग्गज स्नेहभोजनासाठी (Madha Loksabha Politics) एकत्र आले. सत्ताधारी भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.

सौरभ तळेकर | Updated: Apr 14, 2024, 09:04 PM IST
Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण? title=
Sharad pawar, Vijay Singh Mohite Patil, Sushil Kumar Shinde

Madha Loksabha Politics : राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र असत नाही. याचाच अनुभव रविवारी पुन्हा एकदा अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या (Vijay Singh Mohite Patil) शिवरत्न बंगल्यावर आला. साधारण पाच वर्षांपूर्वी मोहिते पाटलांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पवार आणि मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा एकमेकांचा हात हातात घेतला. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) देखील २००९ नंतर प्रथमच मोहिते पाटलांच्या घरी आले. शिंदे मुख्यमंत्री असताना विजयदादा त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच जिल्ह्यातील असण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील ती पहिलीच वेळ होती. त्याशिवाय शेकापचे जयंत पाटील, बाबासाहेब देशमुख, प्रवीण गायकवाड, करमाळाचे शिंदे समर्थक माजी आमदार नारायण पाटील देखील स्नेहभोजनासाठी पोहोचल्यानं महायुतीला जोर का झटका बसलाय.

गेल्यावेळी मोहिते पाटलांमुळं माढ्यामध्ये भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना (Ranjit Singh Naik Nimbalkar) दीड लाखांचं मताधिक्य मिळालं होतं. आता रणजितसिंहांच्या विरोधात मोहितेंनी बंडाचं निशाण फडकवलंय. माढामधून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. आजच्या स्नेहभोजनामुळं केवळ माढाच नाही, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातली राजकीय समीकरणंही बदलली जाणार आहेत. सोलापुरातून शिंदेंची कन्या प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवत आहेत. एवढंच नाही तर सातारा आणि बारामतीतही याचा परिणाम होऊ शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.

शरद पवार, मोहिते पाटील आणि शिंदे हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या राजकारणावर जबरदस्त पकड असलेले तीन दादा नेते आहेत. सध्या वेगवेगळ्या पक्षात असलेले काँग्रेसी विचारांचे जुने मित्र... त्यांची ही नव्यानं झालेली मैत्री पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाची कूस बदलून टाकणार का? असा सवाल देखील सध्या राज्याच्या राजकारणात विचारला जात आहे. 

दरम्यान,  करमाळा मधील माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) आणि माजी आमदार जयवंत जगताप यांचे पुत्र वैभवराजे जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यातील शिंदे गटाचे नेते माजी आमदार नारायण पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता माढ्यात शरद पवार गटाकडून बेरजेचं समीकरण केलं जातं असल्याचं समोर आलं आहे.