Sharad Mohol Murder Case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात पनवेल पोलिसांनी आणखी 11 जणांना अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मुंबईच्या पनवेल आणि वाशी परिसरात धाड टाकून ही कारवाई केली. गुंड विठ्ठल शेलार (Vitthal Shelar), रामदास मारणेला अटक करण्यात आली आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी न्यायालयात (Pune Crime News) धक्कादायक माहिती दिली आहे. आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईल मध्ये टाकले आणि पहिला फोन संतोष कुरपेला केल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय.
शरद मोहोळ याचा खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे हे आरोपी थांबले होते. त्यावेळी आरोपींना त्यांचे नातेवाईक भेटायला आले होते. त्यावेळी आरोपीला एक नवीन सिमकार्ड देण्यात आलं. नवीन सिम टाकल्यानंतर पहिला फोन संतोष कुरपेला फिरवला गेला. त्यावेळी शरद मोहोळचा गेम केलाय, मास्टरमाईंडला सांगा, असं सांगण्यात आलं होतं.
मोहोळचा खून करण्यासाठी 4 पिस्टल आणण्यात आले होते. त्यातील 3 पिस्टल जप्त करण्यात आले आहे. यातील 1 पिस्टल संदर्भातील माहिती खैरे आणि गोळे याला आहे. हडशी येथे गोळीबाराचा सराव केला होता त्यावेळी अजून काही आरोपी उपस्थित होते. आरोपी नितीन खैरे आणि आदित्य गोळे यांनी शस्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत केली होती. आरोपीच्या वतीने लोक अभिरक्षक कार्यालच्या वतीने मयूर दोडके यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीना 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोण आहे विठ्ठल शेलार?
शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला गुंड विठ्ठल शेलार याची काही वर्षांपूर्वी भाजपाच्या युवा शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. शेलार याने 2017 मध्ये पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि पुणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. विठ्ठाल शेलार हा मुळशी तालुक्यामधील बोतरवाडीचा आहे. शेलार सुरूवातीला संदीप मोहोळला संपवणाऱ्या गणेश मारणे या टोळीमध्ये होता.
सुरूवातीला अटक केलेल्या आरोपींची नावे
साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर (वय 20, रा. सुतारदरा, कोथरुड), विठ्ठल किसन गडले (वय 34, रा. सुतारदरा, कोथरुड), अमित मारुती कानगुडे (वय 24, रा. धायरी), नामदेव महिपत कानगुडे (35, रा. भूगाव), चंद्रकांत शाहु शेळके (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष घवाळकर (वय 20, रा. कोथरुड), रवींद्र वसंतराव पवार (वय 40) आणि संजय रामभाऊ उउ्डाण (वय 45, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड)