मुंबई : 2008 मधील मालेगांव स्फोट प्रकरणातील 7 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांच्यावर दहशतवादी कृत्य रचने आणि हत्येच्या कटाचा आरोप लावण्यात आलाय. या आरोपींमध्ये कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचाही समावेश आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानेही आरोप निश्चितीस स्थगिती देणारी याचिका फेटाळून लावली आहे. बॉम्बस्फोटाच्या खटल्याप्रकरणी 'यूएपीए' कायद्यातून दोषमुक्त करण्याची मागणी करणारी याचिका आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित याने केली आहे. त्यावर पुढील महिन्यात सुनावणी घेण्याचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि ए. एस. गडकरी यांच्या खंडपीठाने ठरविले आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार तर सुमारे शंभर जण जखमी झाले होते. या प्रकरणातील आरोपी साध्वी, पुरोहित व अन्य आरोपींची आरोपमुक्तीसाठीची याचिकी एनआयए न्यायालयाने गेल्या महिन्यात फेटाळून लावली होती. आता त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे. सर्व सात आरोपींवर दहशतवादी कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) खटला सुरू आहे.
बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायदा आणि आय.पी.सी अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आला आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये स्फोट घडवून आणण्यात आले होते. यात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या प्रकरणामध्ये 11 जणांना अटक करण्यात आली होती आणि 3 आरोपी हे फरार दाखवण्यात आले होते.
आरोप पत्रामध्ये कर्नल प्रसाद पुरोहित याला मुख्य आरोपी दाखवण्यात आले होते. या आरोपपत्रामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचे म्हटले होते. 25 एप्रिल 2017 साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला जामीन मंजूर करण्यात आला होता. 23 ऑगस्ट 2017 रोजी कर्नल पुरोहिताला जामीन मंजूर करण्यात आला होता. तर 27 डिसेंबर 2017 साली न्यायालयाने कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावरील मकोका हटविण्यात आला होता.