पुणे : कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. शिवाय कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सकारने लॉकडाऊनची देखील घोषणा केली. परंतू शाळांनी मात्र पुढील शैक्षणिक वर्षाकरता पालकांकडून फी मागण्याची सुरूवात केली आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशा सर्व शाळांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांना पुढील वर्षाचे वर्ग सुरू होईपर्यंत शालेय शुल्क न घेण्याचे निर्देश दिले.
पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत शाळा व्यवस्थापनाने फी मागू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांना दिल्या आहेत. लॉकडाऊन काळात देशातील अनेक शाळांनी पालकांना फी भरण्यास सांगितले होते. त्यानंतर पालकांनी याविषयी तक्रार सरकारकडे केली होती. परिणामी सरकारने लॉकडाऊनच्या काळात शाळांनी पालकांकडून फी आकारू नये असे सक्तीचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, हरियाणा सरकारने देखील जारी केलेल्या परिपत्रकात हरियाणा स्कूल बोर्ड, आयसीएसई, सीबीएसई किंवा इतर कोणत्याही मंडळाशी संबंधित सर्व खासगी शाळांना वर्ग पुन्हा सुरू होईपर्यंत शालेय फी न घेण्यास सांगितले आहे.
त्याचप्रमाणे कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर ९ आणि ११वीत असणाऱ्या विद्यार्थांच्या परीक्षा परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.