कृष्णात पाटील, झी मीडिया कोल्हापूर : महापुरामुळं बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत मिळण्याऐवजी ती भलत्याच लोकांना मिळत असल्याचे समार येतं आहे. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवकांना हाताशी धरून मदत लाटण्याचे प्रकार सुरू झाल्यानं खरे पूरग्रस्त मात्र मदतीपासून वंचित राहिले आहेत. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातून हा प्रकार समोर आला आहे.
केवळ या तीन पूरग्रस्तांच्याच पैशांवर डल्ला मारलेला नाही. तर पुरामुळे राखरांगोळी झालेल्या या रांगोळी नावाच्या गावात अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरलंय आणि संसार उद्ध्वस्त झालाय त्यांना आर्थिक मदतीपासून दूर ठेवण्यात येतं आहे. पुराचं पाणी घरात शिरलेल्या कुटुंबीयांना रोख ५ हजार आणि बँक खात्यावर ५ हजार अशी १० हजारांची मदत राज्य सरकार देत आहे. मात्र ग्रामसेवक आणि तलाठी यांनी बनवलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत खरेखुरे पूरग्रस्त कमी आणि बोगस पूरग्रस्त अधिक अशी स्थिती कोल्हापूरच्या रांगोळी गावात दिसून येतं आहे. पूरग्रस्तांसाठी आलेली वस्तू, धान्य रूपात आलेली मदतही दुस-यानीच लाटल्याचे स्थानिक सांगत आहेत.
ज्यांच्या घरांच्या उंबरठ्याला पाणी शिवलेच नाही त्या गावातील पुढारी आणि त्यांचे सगेसाेयरे आर्थिक मदत घेण्यात आघाडीवर आहेत. तर पुरामुळं ज्या सामान्य लोकांची घरे उद्धवस्त झाली आहेत. त्यांना मात्र मदतीसाठी येरझा-या घालाव्या लागत आहेत.
मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच हा प्रकार असून पूरग्रस्तांची यादी बनवताना प्रशासनाने गावातल्या राजकारण्यांना बाजूला ठेवणं गरजेचे आहे.