'या' गावात श्रद्धेपोटी फुलं नाही, तर चक्क दगड वाहून होते पूजा

कोणतं आहे ते गाव... 

Updated: Mar 1, 2020, 11:48 AM IST
'या' गावात श्रद्धेपोटी फुलं नाही, तर चक्क दगड वाहून होते पूजा  title=
संग्रहित छायाचित्र

निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : विविधतापूर्ण देश म्हणून साऱ्या जगात उल्लेखल्या जाणाऱ्या या भारतात अनेक जाती, पंथाचे लोक राहतात. प्रत्येक गावाची वेस ओलांडल्यानंतर तितक्याच वेगळ्या रूढी, परंपरा पाहायला मिळतात. प्रांत बदलतो, तसतशा या परंपराही बदलतात. अशीच एका अजब गावाती गजब प्रथा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. 

अनेक वर्षांपासून एका गावात ही अनोखी परंपरा जोपासली जाते. या गावात श्रद्धेपोटी फुलं नाही तर चक्क दगड वाहून पूजा केली जाते. त्यामुळे हे साधेसुधे दगड नसून, ही खऱ्याखुऱ्या श्रद्धेची फुलं आहेत. 

टिटेघर या गावात फुलं नाही, तर चक्क दगड वाहून पूजा केली जाते. टिटेघर गावच्या सीमेवर असणाऱ्या सतीचा चाफा हे गावकऱ्यांचे श्रद्धेचे स्थान ठरत आहे. या चाफ्याच्या झाडाखाली अनेक वर्षांपासून सतीची वीरगळ आहे. या सती आईची पूजा बेल- फुलं नव्हे तर लहान मोठे दगड अर्पण करून केली जाते. येणारा प्रत्येक वाटसरू सती आईला दगड वाहून नतमस्तक होऊन पुढे जातो. 

पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल

गावातील कोणाचं लग्न असो किंवा कोणतंही शुभकार्य, सती आईला पहिला मान दिला जातो. तेसुद्धा या ठिकाणी दगड अर्पण करुन. आजही ही परंपरा चालू आहे. आजही गावातील जेष्ठ मंडळी आवर्जून ही आख्यायिका सांगतात. या गावातील परंपरा श्रद्धा की अंधश्रद्धा यावरही मतमतांतरं असू शकतात. पण, या परंपरेमुळे गावातील महिलांना मान, सन्मान अधिक दिला जातो हे महत्वाचं आहे.