साताऱ्यात राडा! उदयनराजेंची JCB ने कारवाई; शिवेंद्रराजेंनी उभारलेलं ऑफिस तोडलं

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosle: आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उदयनराजे अचानक काही कार्यकर्ते घेऊन पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या खास स्टाइलमध्ये येथे उभारण्यात आलेलं ऑफिस फोडलं

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 21, 2023, 12:44 PM IST
साताऱ्यात राडा! उदयनराजेंची JCB ने कारवाई; शिवेंद्रराजेंनी उभारलेलं ऑफिस तोडलं title=
साताऱ्यामधील राजकीय वातावरण तापलं

Satara Politics: साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि भाजपाचेच आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं आहे. येथील खिंडवाडीमध्ये शिवेंद्रराजेंनी आयोजित केलेला बाजार समीतीच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम उदयनराजेंनी उधळून लावला आहे. आपल्या कार्यकर्त्यांसहीत नियोजित कार्यक्रम ठिकाणी पोहचून उदयनराजेंनी स्वत:च्या देखरेखीखाली येथे उद्घाटनासाठी उभारण्यात आलेलं एक पत्र्याचं कार्यालय जेसीबीच्या मदतीने फोडलं. उदयनराजेंनी केलेल्या या कारवाईमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नक्की घडलं काय?

साताऱ्यामध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरु आहे. दोघेही एकाच पक्षाचे असले तरी त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. दोघेही अनेकदा एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात. आज सकाळीही असाच प्रकार घडला. बाजार समितीच्या कार्यक्रमाचं भूमिपूजन शिवेंद्रराजेंच्या हस्ते होणार होतं. मात्र सकाळीच उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसहीत या नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना या ठिकाणी उभारण्यात आलेलं छोटं कार्यलय उद्धवस्त करण्यास सांगितलं. हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचून उदयनराजेंनी हा कार्यक्रम उधळून लावला. कार्यक्रमासाठी एक पत्र्याचं ऑफिस उभारण्यात आलं होतं. हे ऑफिस उदयनराजेंच्या देखरेखीखाली जेसीबीने उद्धवस्त करण्यात आलं. यासंदर्भात अद्याप दोन्ही नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे साताऱ्याच्या राजकारणामध्ये दोघांमधील संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

आक्षेप काय हे अस्पष्ट

उदयनराजेंच्या मनात काय होतं, त्यांना या कार्यक्रमाला आमंत्रण होतं की नाही? या कार्यक्रमाबद्दल त्यांचा आक्षेप काय होता याबद्दलची भूमिका त्यांनी मांडलेली नाही. या कार्यक्रमाला उपस्थिती न लावता त्यांनी जेसीबीने कार्यक्रमासाठी उभं केलेलं ऑफिस उलटवून लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे ऑफिस उदयनराजेंनी स्वत:च्या देखरेखीखाली तोडलं. या ऑफिसवर कारवाई सुरु असताना उदयनराजे समोर उभे राहून फोनवर कोणाशी तरी बोलताना आणि सूचना करताना दिसले.  कार्यकर्त्यांना हे ऑफिस उलटवून लावा असं सांगण्यात आलं. 

शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली नाराजी

उदयनराजेंच्या देखरेखीखाली झालेल्या या कारवाईनंतर आमदार शिवेंद्रराजेंनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र घडलेल्या प्रकरणाबद्दल शिवेंद्रराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारे एखादा भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावणे योग्य नाही. एखादा विकासकामांच्या भूमिपूजनाला कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याची उंची वाढवणं लोकप्रितिनिधींकडून अपेक्षित असतं. उदयनराजेंनी राजकीय स्वार्थातून हे केलं आहे असं शिवेंद्रराजेंकडून सांगण्यात आलं आहे. यानंतरही भूमिपूजन करणार का याबद्दलची भूमिका शिवेंद्रराजेंनी मांडलेली नाही.