तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत लंडनच्या म्युझियममधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं (Wagnakha) साताऱ्यात आणली. गेल्या 19 जुलैला समारंभपूर्वक वाघनखं प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साताऱ्यात पार पडलं. वाघनखांच्या प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. अफजलखानाच्या वधासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वाघनखं वापरली होती, असा दावा मंत्र्यांनी आपल्या भाषणात केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांचा उपयोग करत स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वध केला होता, तो चित्त थरारक प्रसंग पिढ्यांपिढ्या आपण सगळे ऐकत आलो. त्याच प्रसंगांमधील जे प्रमुख शस्त्र होतं ती वाघनखं अनेक वर्ष लंडनच्या म्युझियममध्ये होती. ती आपल्या भारतात या ठिकाणी आली आणि खऱ्या अर्थाने आमची राजधानी असलेल्या साताऱ्यात वस्तू संग्रहालयात आपल्या सर्व भारतीयांना आणि शिवप्रेमींना दर्शनासाठी उपलब्ध झाली, यापेक्षा मोठं भाग्य असू शकत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माहिती फलकावर वेगळाच उल्लेख
मात्र वाघनखं प्रदर्शनात लावण्यात आलेल्या माहिती फलकावर तसा स्पष्ट उल्लेख नाही. 'इ. स. 1659 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूरचा सरदार अफजल खानास ठार केल्याचा उल्लेख वाघनखाच्या डबीवर केलेला दिसून येतो. ग्रँट डफ हे ब्रिटनला परतल्यानंतरही राजघराण्यातील संग्रहात इतर वाघनखे असल्याची नोंद दिसते. त्यामुळं ही वाघनखे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारण्याकरिता वापरलेली आहेत किंवा कसे? याबाबत पडताळणी करता येणे शक्य होत नाही', असा उल्लेख फलकावर आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमशी पत्रव्यवहार केला होता. ही वाखनखं शिवाजी महाराजांची आहेत किंवा त्यांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेली आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही, असा दावा सावंतांनी केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं ठेवण्यासाठी कोल्हापुरात 7 कोटी रुपये खर्च करून स्ट्राँग रूम बांधली जातेय. शिवशस्त्र शौर्यगाथा उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतंय. मात्र या वाघनखांच्या इतिहासावरून सुरू झालेला वाद थांबता थांबत नाहीय. जर ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरलेली नसतील तर इतका पैसा खर्च करण्याचं कारण काय, हा सवाल कायम आहे.