संतोष पोळला मोबाईल देणाऱ्या १५ पोलिसांचं निलंबन

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या आदेशानंतर यापूर्वी एकाचं निलंबन 

Updated: Dec 8, 2018, 12:56 PM IST
संतोष पोळला मोबाईल देणाऱ्या १५ पोलिसांचं निलंबन  title=

कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा जेलमधील वाई इथला सिरियल किलर डॉक्टर संतोष पोळ याला मोबाईल पुरवल्या प्रकरणी कारागृह प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. तब्बल १५ अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आलंय. 'झी मीडिया'ने सिरियल किलर  संतोष पोळ याच्याकडे मोबाईल आणि पिस्तुल सदृश्य वस्तू असल्याची बातमी सर्वप्रथम दाखवून राज्यातील कारागृहात नेमकं काय चाललंय हे दाखवले होते. त्यानंतर कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यानी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तब्बल तीन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर तात्काळ एका कर्मचाऱ्याचे निलंबन केल होतं.

या प्रकरणी आणखी मोठी कारवाई होणे गरजेचे असल्याने 'झी मीडिया' पाठपुरावा केला होता. त्यानंतर अखेर कारागृह प्रशासनाने तब्बल १५ अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन केलं. कारागृह प्रशासनानं केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जातंय.

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे

- सुभेदार आर के सावंत 

- हवालदार नेसारवली शेख

- हवालदार दिलीप गायकवाड 

- हवालदार जयवंत रामचंद्र शिंदे 

- शिपाई राजू नारायण शिंदे

- शिपाई प्रमोद इंद्रजित इंगळे

- शिपाई समाधान शिवाजी पवार 

- शिपाई ज्ञानदेव मुरलीधर जाधव

- शिपाई उस्मान निजाम पठाण 

- शिपाई युनूस खुदा बक्ष शेख

- शिपाई सतीश गद्रे

- शिपाई विनय खामकर

संतोष पोळच्या कारागृहातील व्हिडिओमुळे खळबळ

कोल्हापुरातल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या ढिसाळ कारभाराची कथा झी मीडियानं समोर आणली होती. वाईचा 'कसाई' अशी ओळख असलेला संतोष पोळ हा सध्या तुरूंगवास भोगतोय. या संतोष पोळनं वाईमध्ये तब्बल ६ खून करून त्या मृतदेहांची परस्पर विल्हेवाट लावली होती. आपल्या घराच्या मागेच खड्डे खोदून त्यात हे मृतदेह पुरले होते. या संतोष पोळचे तुरूंगाच्या कोठडीतले व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती लागले होते. तुरूंग अधिकारी चंद्रकांत आवळे यांनीच आपल्याला ही रिव्हॉल्व्हर दिली, असा गौप्यस्फोट संतोष पोळनं या व्हिडिओ क्लीपमध्ये केलाय. सहा जणांची अत्यंत क्रूरपणं हत्या करणाऱ्या संतोष पोळसारख्या सिरीयल किलरकडं मोबाईल आणि रिव्हॉल्व्हर सारख्या वस्तू कुणी पोहचवल्या? असा प्रश्न निर्माण झाला होता.