गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) हिंगोली कळमनुरी विधानसभा मतदारसंघांचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आमदार संतोष बांगर यांच्या दादागिरीचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. बांगर यांनी इंजिनियरींग कॉलेजच्या प्रोफेसरचा कान जोरात पिरगळला आहे. त्यांच्या या कारनाम्याचा व्हिडिओ सोळ मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संतोष बांगर यांनी हिंगोलीत एका वयोवृद्ध प्राचार्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बांगर यांनी सर्वांसमोर प्राचार्यांचे कान पकडले आणि त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे.
यापूर्वी बांगर यांनी हिंगोलीचे कृषी अधीक्षक अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती. वीज कापली म्हणून बांगर यांनी पवार नावाच्या एका कर्मचाऱ्याला रट्टे देईन अशी धमकी दिली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी समज दिल्या नंतर ही आमदार बांगर यांचे कारनामे सुरूच आहेत.
आमदार बांगर यांनी प्राचार्याला का मारहाण केली हे मात्र अद्याप समजू शकलेने नाही. हातात कायदा घेणाऱ्या या आमदारावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही कारवाई करतात की नाही असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
आमदार संतोष बांगर कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत
शिंदे गटाचे हिंगोलीतील बंडखोर आमदार संतोष बांगर नेहमीच चर्चेत असतात. मध्यान्ह भोजनामध्ये दिल्या जाणाऱ्या वरणात अळ्या सापडल्या होत्या तेव्हा त्यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. ऑक्टोबरमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयात राडा घातला होता. त्यांनी शोतकऱ्यांसह पिकविमा कार्यालयाची तोडफोड केली होती. बांगर यांनी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याला फोनवरुन मारण्याची धमकीही दिली होती. मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन त्यांनी गोंधळ घातल्याची चर्चा होती.